आपल्याला आयुष्यात असे अनेक लोक भेटतात जे आपल्याला कोणतीही गोष्ट करण्यापासून अडवत असतात. त्यासाठी “तुमसे ना हो पाएगा” हे त्यांचे असे नकारात्क वाक्य नेहमी आपण ऐकत असतो. छोट्या पडद्यावरील ‘गुड्डन, तुमसे ना हो पाएगा!’ मालिकेद्वारे हा नकारात्मक दृष्टिकोन दूर सारून लोकांनी कोणत्याही गोष्टीकडे “हो, मी हे करू शकतो!” अशा आशावादी भूमिकेकेतून पाहण्याचा संदेश दिला जात आहे.
आता या मालिकेत अक्षत जिंदल या नायकाची भूमिकेत झळकलेला अभिनेता निशांतसिंह मलकाणी याने “तुमसे ना हो पाएगा आव्हान” स्वीकारले आहे. आपल्याला जी गोष्ट येत नाही, ती शिकून त्यात प्रावीण्य मिळविण्याचा निर्धार त्याने केला आहे. निशांतसिंह सध्या पाककृती शिकत आहे आणि मालिकेतील आपल्या व्यक्तिरेखेला वास्तवतेचा स्पर्श देण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण मालिकेत तो एका शेफची भूमिका साकारत असून ती भूमिका वास्तववादी वाटावी, यासाठी त्याने कुकिंग कसे करतात, ते शिकण्याचा निश्चय केला आहे.
आपल्या या नव्या छंदाबद्दल निशांतसिंह म्हणाला, “मला यापूर्वी कधी कुकिंग शिकण्याची वेळच आली नव्हती. मी दिल्लीत असताना माझी आईच जेवण बनवायी. आयआयएममध्ये शिकण्यासाठी मी कोलकात्यात राहात असताना तिथे मी स्वयंपाकासाठी एक बाई कामाला ठेवली होती. या मालिकेत माझं अक्षत जिंदलची व्यक्तिरेखा एक शेफ आहे, असं मला समजल्यावर मी मनाशी म्हटलं की आपणही आता स्वयंपाक कसा करतात, ते शिकून घ्यावं. मुंबईतील माझ्या आचाऱ्याची मी या कामी थोडी मदत घेतली आणि स्वयंपाकाच्या काही मूलभूत गोष्टी शिकून घेतल्या. त्याने मला डाळ, पोळी आणि भाजी कशी करायची, ते शिकवलं. सुरुवातीला पोळी गोल लाटणं हे एक मोठं काम होतं. पण सवयीने आणि प्रयत्न केल्यावर दोन महिन्यांनंतर मला ते अखेरीस जमलं.”
तो पुढे सांगतो, “आता अशी स्थिती आहे की जेव्हा माझा आचारी कामावर येत नाही, तेव्हा मी यू-ट्यूबवर जाऊन स्वयंपाकाचे धडे गिरवितो. मला आता असं वाटतं की स्वयंपाक करणं ही मनावरचा ताण हलका करणारी कला आहे. आणि तो करताना मला अतीशय आनंद आणि समाधान मिळतं. इतकंच नव्हे, तर यामुळे आता मला माझी भूमिका साकारताना माझ्या या गोष्टीचा फायदा झाला. आता मी अभिमानाने म्हणू शकतो, ‘निशांत तुमसे हो पाएगा.’”