मनोरंजन विश्वाला अनेकदा बेभरवश्याचं मानतात. कारण इथे कलाकारांना कधी अनेक कामं मिळतात तर कधी कोणत्याही प्रोजेक्टची ऑफर न मिळाल्याने कलाकारांना घरीच बसावं लागतंय. अशीच काहीसा अनुभव एका सुप्रसिद्ध अभिनेत्याला आला आहे. हा अभिनेता म्हणजे करण पटेल. मालिकाविश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे करण पटेल. 'ये हे मोहब्बते' या मालिकेतून करण पटेलला (karan patel) खूप लोकप्रियता मिळाली. परंतु गेल्या सहा वर्षापासून करण अभिनय क्षेत्रापासून गायब आहे. काय आहे यामागचं कारण? याचा खुलासा करणने केलाय.
करण पटेलला सहा वर्षापासून एकही नवी ऑफर नाही
करण पटेल नुकताच भारती सिंग आणि हर्ष लंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये दिसून आला. त्यावेळी करणने शॉकिंग खुलासा केला की, "गेल्या सहा वर्षांपासून मला टीव्ही मालिकेची एकही ऑफर आली नाही. एखादी छोटीशी भूमिकाही मला कोणी विचारली नाही. सध्या रोज १५० ते २०० कलाकार जन्म घेतात. हे कलाकार आमच्यापेक्षा कमी पगारात काम करतात. एक वेळ अशी होती जेव्हा टेलिव्हिजनमध्ये खूप पैसे होते. परंतु आता एखादी मालिका करण्याऐवजी त्याच पैशात दोन वेबसीरिज कराव्यात, असा विचार निर्माते करतात. परंतु प्रश्न हा गुणवत्तेचा आहे. खरंच त्यामध्ये दर्जा असतो का?"
या काळात करणने ओटीटीवर काम का केलं नाही? याविषयी विचारलं असता करण म्हणाला की, "मला कसलीच ऑफर मिळाली नाही. चांगली, वाईट कोणत्याही प्रकारची भूमिका मला मिळाली नाही. सध्या ओटीटी खूप वाईट झालंय. कारण इथे अनेक माणसं विविध प्रकारची कामं करत आहेत. त्यामुळे ओटीटीमध्ये ती मजा राहिली नाही. सध्या ओटीटीवर अनेक शो हे सॉफ्ट पॉर्न बनले आहेत. जर ओटीटीमध्ये अश्लीलता किंवा लव मेकिंग सीन नसतील, तर त्याला कोणी बघणार नाही. त्यासाठी कथेची आवश्यकता नाही.", असं वास्तव करणने सर्वांना सांगितलं