मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या १०-१२ दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यातील काही गोष्टी या अभूतपूर्व अशा स्वरूपाच्या आहेत. आज राज्याच्या विधिमंडळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्यासाठी सर्वच पक्षांनी व्हिप (पक्षादेश) जारी केला होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे असा पक्षादेश जारी केला होता. तशातच आता शिवसेनेच्या बंडखोर गटाने हा आदेश धुडकावून लावत शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या लेटरहेडवरून भरत गोगावले यांच्या स्वाक्षरीचा दुसरा व्हिप जारी केला होता. दरम्यान, महाविकास आघाडीला मोठा धक्का लागला असून राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याच दरम्यान या सर्व राजकीय घ़डामोडींवर अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
किरण माने हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असून विविध मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करत असतात. आताही त्यांची "राजकारणी लोकं लै वांड!" ही फेसबुक पोस्ट जोरदार व्हायरल होत असून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. "राजकारणी लोकं लै वांड! भाजपाने शब्द फिरवल्यावर शिवसेनेने कोलांटउडी मारून मुख्यमंत्रीपद मिळवलं. राष्ट्रवादी-काँग्रेसला सत्ता मिळणारच नव्हती. ती त्यांनी तब्बल अडीच वर्ष रेटून भोगली! दोनवेळा हुकलेलं मुख्यमंत्रीपद शिंदेकडे 'जॅकपॉट' लागल्यागत दिलं. या सगळ्यात ज्यांची मुख्यमंत्रीपदासाठी तडफड चालली होती, ते बिचारे निरूपयोगी पदावर बसवले!" असं म्हटलं आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये किरण माने यांनी डांबरट राजकारणी हा हॅशटॅग देखील वापरला आहे. याआधी देखील त्यांनी "काय स्पीड हाय राव…, देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा" अशी एक पोस्ट केली होती. "काय स्पीड हाय राव…आपण उगीच कोर्टाच्या वेळखाऊ कामकाजाला शिव्या देतो. आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा. आज संध्याकाळी ६.३०ला एकनाथ शिंदेंची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. रविवार असून संध्याकाळी ७.३० वाजता रजिस्ट्रीनं याचिका स्वीकारली आणि उद्या २७ला सुनावणी ठरवलीसुद्धा…निकालच लावून टाकायचा ना थेट…जय सुप्रीम कोर्ट" असं किरण माने यांनी म्हटलं होतं.