Join us

Kiran Mane : ‘आमदार’ या पदाच्या अब्रूचा पार पंचनामा चाल्लाय...., किरण माने यांची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 10:24 AM

Kiran Mane Post on Maharashtra Political Crisis : सत्ता बळकावणार्‍याला नाही तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्‍याला इतिहास लक्षात ठेवतो..., मुख्यमंत्र्यांच्या भावनिक भाषणावरही दिली प्रतिक्रिया

Kiran Mane Post on Maharashtra Political Crisis :  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळते आहे. काल या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  ( Uddhav Thackeray ) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भावनिक भाषण केलं. ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचं नेतृत्व करण्यास नालायक आहे, हे मला सांगावं, मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार आहे. मी याक्षणी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तिचं असतं, असे भावनिक भाषण ठाकरे यांनी केलं. इतकंच नाही तर यानंतर रात्री ‘वर्षा’ सोडून ते ‘मातोश्री’कडे रवाना झालेत. त्यांच्या भाषणानंतर शिवसैनिक भावुक झालेले पाहायला मिळाले. अनेकांनी त्यांच्या या भावनिक भाषणावर प्रतिक्रिया दिली. अभिनेते किरण माने यांनीही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून यावर आपली प्रतिक्रिया दिली.

 किरण माने यांची पोस्ट...

‘अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले !  एवढं घडूनही 'Cool' आहेत हे लै भारी. सत्तेसाठी तडफडणार्‍या, आक्रस्ताळेपणा करणार्‍या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला. सत्ता बळकावणार्‍याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्‍याला इतिहास लक्षात ठेवतो....’, अशा आशयाची पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

याशिवाय किरण माने यांनी सद्याच्या राजकीय स्थितीवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आमदार’ या पदाच्या अब्रूचा पार पंचनामा चाल्लाय.., अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

त्यांनी लिहिले...

  

लै हस्तोय च्यायला... 'आमदार' या पदाच्या अब्रूचा पार पंचनामा चाल्लाय. नाय नाय, याआधीबी बंडखोरी झालीय की महाराष्ट्रात. लै वेळा झालीय. पन झालीय तवा खुलेआम झालीय. हितं मराठी मातीत र्‍हाऊन. तोंडावर. स्वखुशीनं. पन ही काय अवस्था बघतोय ! आरारारारा. भटकी जनावरं धरून कोंडवाड्यात भरावीत तशी अवस्था झालीय एकेकाची. त्या पत्रकारानं लाखात एक प्रश्न इचारलाय, "ऐसा क्या किया आपने जो आप भाग रहे है?"...ते आमदार गेलं खाली मान घालून. हाड तिच्यायला. आपून पाठीचा कना घिवून जन्माला आलोय भावांनो. काम काढून घेतलं तरी असल्या बांडगुळांफुडं झुकलो नाय. तुरूंगात टाकलं तरी चालंल, जीव घेतला तरी चालंल पन आईशप्पत अस्ली भयान अवस्था होऊन देनार नाय सोत्ताची...

या पोस्टसोबत त्यांनी बंडखोर आमदारांचा विमानतळावरचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात एक आमदार अक्षरश: पळताना दिसत आहेत.

टॅग्स :किरण मानेउद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदे