‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातील एक हरहुन्नरी कलाकार आणि ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणजे गौरव मोरे (Gaurav More ). गौऱ्या म्हणजे चाहत्यांचा लाडका कलाकार. त्याच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. अभिनेते किरण माने हेही गौरवचे फॅन आहेत. किरण माने यांनी गौरवसाठी खास पोस्ट लिहित त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. गौरव मोरेबरोबरचा एक सुंदर फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलंय, “…बिगबॉसच्या घरात बाहेरच्या जगातल्या लै लै लै गोष्टी मिस केल्या… त्यापैकीच एक म्हणजे कधीबी, कुठंबी मन आनि मेंदू फ्रेश करून टाकनारे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे भन्नाट एपिसोडस् ! सम्या, प्रभाकर, नम्रता, प्रसाद, ओंकार, अरूण आणि सगळी टीमच जबराट हाय… काॅमेडीत यांचा कुनी नाद नाय करायचा. पन ह्या सगळ्या जत्रेत बेसन लाडूमधल्या बेदान्यागत उठून दिसनारा सगळ्यांचा लाडका गौऱ्या म्हंजेच गौरव मोरे !! गौऱ्याची काॅमेडी म्हंजे नादखुळा… भिरकीट… काटा किर्रर्रर्र. गौऱ्याचं एकबी स्कीट असं नाय, जो बघून मी हसून हसून बेजार झालो नाय !!! लैच खतरनाक विनोदवीर. आज गौऱ्याचा वाढदिवस. आमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवन्याचं अनमोल काम केल्याबद्दल लै आभार दोस्ता. वाढदिवसाच्या काळजापास्नं शुभेच्छा गौरव. लब्यू...”
पवई फिल्टरपाडामध्ये राहणाऱ्या गौरवने अनेक एकांकिका स्पर्धा, युथ फेस्टिवल गाजवले. हे सगळं करत असताना ‘जळू बाई हळू’ या नाटकात अभिनेता आनंदा कारेकरचा बदली कलाकार म्हणून तो काम करत होता.‘जळू बाई हळू’ या नाटकात काम सुरू असतानाच प्रसाद खांडेकर यांच्या पडद्याआड या एकांकिकेसाठी गौरव काम करू लागला आणि याच एकांकिकेमुळे त्याला नवी ओळख मिळाली. माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून त्यानं मालिकाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तो विनोदी भूमिका करत होता. मराठी चित्रपट आणि मालिकेतील त्याचं काम पाहून हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याला संधी मिळाली. संजू, कामयाब, झोया फॅक्टर या चित्रपटातील त्याच्या कामाची चांगली वाहवा झाली.