सध्या सन मराठीवर सुरु असणाऱ्या 'महाराष्ट्राची महामालिका' ह्या उपक्रमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. मनोरंजनाच्या महामेजवानी सोबतच, प्रेक्षकांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधीही यानिमित्ताने मिळत आहे. ‘संत गजानन शेगावीचे’ ही या उपक्रमातील एप्रिल महिन्यातील ‘महाराष्ट्राची महामालिका’ आहे. मनोरंजन आणि भक्तिभावाने परिपूर्ण असलेली ही मालिका आता एक रंजक वळण घेऊन, मालिकेचे अनेक नवे पैलू उलगडणार आहेत.
मालिकेचे कथानक काही वर्षांनी पुढे गेले असून संत गजानन महाराजांच्या भूमिकेत एक नवा अष्टपैलू कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेष्ठ अभिनेते मनोज कोल्हटकर ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. तसेच, आपल्या विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते गणेश यादव हे ‘संत गजानन शेगावीचे’ मालिकेतून एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे अभिनेते मनोज कोल्हटकरांचा गजानन महाराजांच्या भूमिकेतील मालिकेमध्ये प्रवेश आणि गणेश यादव यांची मालिकेतील पाहुणा कलाकार म्हणून विशेष भूमिका कथानकात काय रंजकता आणणार हे पाहण्यासाठी आता प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे.
मनोज कोल्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते झी मराठी वाहिनी वरील होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेतून घराघरात पोहचले. मराठीशिवाय त्यांनी हिंदी चित्रपट आणि मालिकेत काम केले आहे.