'आई कुठे काय करते' मालिका आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर अरुंधतीने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशमुख कुटुंबाला अरुंधतीचा विरह सहन होत नाहीय. अशातच अनिरुद्धचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखच्या येण्याने कुटुंबातल्या प्रत्येकालाच थोडा धीर मिळाला आहे. देशमुख कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा पुर्ववत करण्याची जबाबदारी सध्या अविनाशच्या खांद्यावर आहे. अभिनेते मिलिंद गवळी आणि शंतनू मोघे या मालिकेत भावाची भूमिका साकारत आहेत. याआधी तेरा वर्षांपूर्वी या दोघांनी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे या लाडक्या सहकलाकारासोबत तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आल्याचा आनंद मिलिंद गवळी यांनी शेअर केला आहे.
‘शंतनु मोघे या अतिशय गोड माणसाबरोबर तेरा वर्षांपूर्वी ‘हळद तुझी कुंकू माझं या सिनेमामध्ये पहिल्यांदा काम केलं. या सिनेमाचं संपूर्ण शूटिंग साताऱ्याच्या आजुबाजूच्या खेडेगावात झालं. शंतनूचा तो पहिलाच मराठी चित्रपट होता. मराठी चित्रपट सृष्टीत त्याचं पदार्पण या सिनेमानं झालं. एका उत्तम कलाकाराचा तो मुलगा असल्यामुळे त्याच्यातही ते सगळे गुण होते. पहिलाच चित्रपट असला तरी कामाची जाण खूप छान होती, कष्ट करायची तयारी होती. त्याचा सगळ्यात उत्तम गुण म्हणजे तो माणूस म्हणून खूपच गोड आणि लाघवी आहे.
सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्याच्याशी छान मैत्री झाली. मात्र त्यानंतर त्याची माझी भेट झाली नाही. आई कुठे काय करते मालिकेच्या निमित्ताने आम्ही तेरा वर्षांनी भेटलो. मालिकेत अविनाशही अनिरुद्धला जवळपास पंधरा वर्षांनी भेटतो असा प्रसंग आहे. माझ्यासाठी शंतनू आणि अविनाशचं येणं हा योगायोगच आहे असं वाटतं. खरतर अविनाश या व्यक्तिरेखेचं कास्टिंग जवळपास दोन महिने सुरु होतं. ही भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता होतीच. पण शंतनूचं नाव कळताच मला अतिशय आनंद झाला अशी भावना अभिनेते मिलिंद गवळी यांनी व्यक्त केली.’
तर अभिनेता शंतनू मोघेनेही मिलिंद गवळी यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य असल्याचं म्हण्टलं आहे. आज पर्यंत अनेकांशी संपर्क आला, पण काही लोक आपल्या मनात एक अढळ स्थान निर्माण करतात. त्यापैकी एक म्हणजे मिलिंद गवळी. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि मनाचा मोठेपणा. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारख्या मोठ्या माणसाचा सहवास इतका जवळून लाभतोय.