Join us

अभिनेता मिलिंद गवळीने ह्या भूमिकेसाठी वाढविले वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 3:13 PM

मिलिंद गवळी पहिल्यांदाच बॉक्सरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

ठळक मुद्देमिलिंद गवळी पहिल्यांदाच दिसणार बॉक्सरच्या भूमिकेत सारे काही तुझ्याचसाठी मालिकेत वेगळी प्रेमकथा

सोनी मराठी वाहिनी नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वाहिनीवरील सारे काही तुझ्याचसाठी या मालिकेत अभिनेता व दिग्दर्शक मिलिंद गवळी नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तो बॉक्सिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी वजन वाढवावे लागले आहे. 

मिलिंद गवळी पहिल्यांदाच बॉक्सरची भूमिका साकारीत आहे. याबद्दल तो एका संकेतस्थळाच्या मुलाखतीत म्हणाला की, आजवर मी बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत. पण बॉक्सरची भूमिका पहिल्यांदाच करतो आहे. मी सॅम नामक बॉक्सिंग कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची स्वतःची इन्स्टिट्युट आहे. तिथे मालिकेतील नायिका गौतमी देशपांडे बॉक्सिंगचे धडे गिरवण्यासाठी येते. कोच कडक शिस्तीचा असतो आणि त्याने त्याच्या काळात बॉक्सिंगची रिंग गाजवलेली असते. सारे काही तुझ्याचसाठी या मालिकेतील भूमिकेची तयारी करण्यासाठी मिलिंदने जिम जॉईन केली. जवळपास पाच महिने त्याने दोन तास जिममध्ये घाम गाळला आणि बॉडी बनवली. त्याने जवळपास पाच किलो वजन वाढविले आहे. तसेच बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले. स्टेट चॅम्पियन कृष्णा यांच्याकडून त्याने बॉक्सिंगचे धडे घेतले असल्याचे त्याने सांगितले.सारे काही तुझ्याचसाठी या मालिकेची कथा बॉक्सिंगपटू मुलीभोवती फिरते. या मालिकेत एक वेगळी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील नायिका बॉक्सर आहे आणि नायक क्लासिकल गायक आहे. या दोघांची प्रेमकहाणी आणि करियरकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रेरणादायी ठरणार आहे.