छोट्या पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेते नागेश भोसले (Nagesh Bhosle) यांनी देवयानी मालिकेत साकारलेली सर्जेराव विखे पाटीलची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली होती. अनेक मालिकांसोबत नागेश यांनी 'चिंटू २', 'प्यार वाली लव्ह स्टोरी', 'दुनियादारी', 'धग', 'गावठी', 'योद्धा', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत 'मुजरा' आणि 'पन्हाळा' अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मराठीसह नागेश भोसले 'शूल', 'सरकार', 'क्यूँ की', 'डी', 'आखरी डिसीजन', 'दम', 'बर्दाश्त' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही झळकले आहेत. लवकरच ते तमाशा या आगामी चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, नागेश भोसले यांच्या पत्नीदेखील अभिनेत्री आहेत, हे फार कमी लोकांना माहित आहे.
नागेश भोसले यांच्या पत्नी जॉय भोसले या देखील अभिनेत्री आहेत. विजय कदम सोबत त्यांनी सहकलाकाराची भूमिका केली होती. ‘जॉय कलामंच’ या त्यांच्या निर्मिती संस्थेतून त्यांनी कळत नकळत, पाऊले चालती पंढरीची वाट या नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. इतकेच नाही तर जॉय भोसले या सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवली होती.