Join us

अभिनेता पंढरीनाथ कांबळेनं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 11:15 AM

Pandharinath Kamble : कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिकमधून पंढरीनाथ कांबळे प्रकाशझोतात आला होता.

झी मराठी वाहिनीवर फु बाई फु (Phu Bai Phu) या शोच्या दहाव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या शोमध्ये अनेक नामवंत कलाकार मंडळी प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहेत. या शोमध्ये सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra)मधील कलाकार मंडळी दाखल झालेले तुम्ही पाहिले आहेत. त्यामुळे या कलाकारांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सोडला अशी चर्चा रंगली आहे. ओंकार भोजने (Onkar Bhojane) हा तर महाराष्ट्राचा हास्यजत्राचा कोहिनूर मानला जातो. मात्र त्यानेदेखील हा शो सोडला आहे. 

ओंकार आता फु बाई फु मध्ये दिसणार असल्याने हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांना याबाबत विचारले तेव्हा त्यांनी म्हटले होते की, ओंकार आमच्या शोची जान आहे. तो या शोमध्ये होता तेव्हा त्याला वेगवेगळ्या संधी मिळाल्या होत्या. अगदी हिंदी चित्रपटातही त्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. तो कुठेही गेला तरी हास्यजत्रामध्ये परत येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला होता. एकीकडे ओंकारला हास्यजत्रामुळे मानाचे स्थान मिळालेले असताना दुसरीकडे मात्र याच शोमधील पॅडी कांबळे म्हणजेच पंढरीनाथ कांबळे याने वेगळाच खुलासा केलेला पाहायला मिळतो. 

कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिकमधून पंढरीनाथ कांबळे प्रकाशझोतात आला होता. फु बाई फुच्या शोमध्ये त्याला आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र हास्यजत्रामध्ये होतो तेव्हा आपल्या असण्याचा आणि नसण्याचा कोणालाच काही फरक पडत नव्हता अशी एक बाजू त्याने मांडलेली पाहायला मिळत आहे. याबाबत तो म्हणतो की, मला सतत एकाच एक भूमिका मिळत गेल्याने त्याच त्याच भूमिकेत मला लोकांनी पाहिले, म्हणून मी मधल्या काळात नाटकाकडे वळलो. त्यादरम्यान चित्रपटातही माझं काम चालू होतं. पण जेव्हा आपल्या वैयक्तिक कारणामुळे शो थांबवावा लागतो किंवा त्या शोला आपली गरज नाही.असे वाटायला लागते तेव्हा कोणीतरी ‘जा ‘ असं म्हणण्यापेक्षा आपण स्वतःहूनच शोमधून बाहेर पडलेलं बरं असतं.’ 

तो पुढे म्हणाला की, मी या शोमधून बाहेर पडल्यानंतर काही काळासाठी विश्रांती घेणार होतो मात्र फु बाई फुने मला आमंत्रण दिले आणि नवीन कलाकारांसोबत काहीतरी नवीन शिकायला मिळेल म्हणून ते आमंत्रण मी स्वीकारले. अर्थात पूर्वीचा शो सोडताना माझा कोणावरही राग नाही हे मी इथे स्पष्ट करतो. यापूर्वी देखील अनेक कलाकार अशाच समस्यांना सामोरे गेलेले पाहायला मिळालेले आहेत. पण ज्या कलाकाराच्या काम करण्याची जिद्द आणि स्वतःवर विश्वास आहे असे कलाकार हार मनात नाहीत उलट नव्या जोमाने मिळेल ती कामे करतात. त्यामुळे त्यांना पूर्वीपेक्षा देखील चांगली लोकप्रियता मिळते.