‘स्टार भारत’वरील ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ ही नर्म विनोदी मालिका दर आठवड्यास नव्या संकल्पना आणि कथा प्रेक्षकांपुढे सादर करून त्यांना गुदगुल्या करीत असते. सध्या या मालिकेचे कथानक वृध्दाश्रम या संकल्पनेशी निगडित असून या कथानकासाठी लोकप्रिय अभिनेते राजेंद्र गुप्ता हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतील.
मालिकेतील प्रतिभाचे काका (ताऊजी) यांची भूमिका ते साकारणार आहेत. पांचाळ परिवारात प्रतिभा ही उच्च शिक्षित सून असून तिचे काका लग्नाच्या विरोधात असतात. या कथानकाच्या भागांमध्ये प्रतिभा त्यांना कशी आपण विवाहित नसल्याचे भासविते आणि एका वृध्दाश्रमाचा देखावा उभा करते. आपल्या कसदार अभिनयाच्या कीर्तीला जागून राजेंद्र गुप्ता यात आपली भूमिका चोख पार पाडताना दिसेल.
या भूमिकेविषयी त्यांच्याशी चर्चा करताना राजेंद्र गुप्ता म्हणाले, “‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका करताना मला त्या टीमबरोबर काम करताना खूप मजा आली. सेटवरील सर्वजण, अभिनेत्यांपासून निर्मात्यांच्या टीमपर्यंत सारेजण अगदी सर्जनशील असून ते आपल्या व्यक्तिरेखांबाबत सुस्पष्ट आहेत. तसंच माझा पडद्यावरील रूप हे ताऊजीच्या भूमिकेसात अगदी चांगलं शोभून दिसलं आणि त्यासाठी मला फारशी रंगभूषाही करावी लागली नाही. आता हे भाग कधी प्रसारित होतात, त्याची मी वाट बघत आहे.”
छोट्या पडद्यावरली ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेची प्रेक्षकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असून या वाहिनीवरील ती सर्वाधिक लोकप्रिय मालिका बनली आहे. मालिकेत कन्हैय्याची भूमिका साकारणा-या मणिंदरसिंगने विनोदाचे अचूक टायमिंग आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. तो स्वत: उत्कृष्ट अभिनेता तर आहेच, पण त्याला भारतीयांच्या सर्वात आवडत्या खेळाचीही- क्रिकेटची- प्रचंड आवड आहे. इतकेच नव्हे, तर त्याला हा खेळ इतक्या उत्तम प्रकारे खेळता येतो की त्याच्या परिसरात त्याला सचिन म्हणूनच ओळखले जाते.पण छोट्या गावातील रहिवासी असल्याने त्याला व्यावसायिक क्रिकेटपटू होण्यासाठी योग्य मार्गदर्शन लाभले नाही. त्यामुळे त्याला क्रिकेटर बनता आले नाही. क्रिकेटर बनण्याचे त्याचे स्वप्न अपुर्णच राहिले.परिणामी त्याने अभिनय क्षेत्रात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्याने चांगलेच यश मिळविले आहे.अर्थात तरीही क्रिकेटवरील त्याचे प्रेम जराही कमी झाले नसून क्रिकेट खेळण्याची संधी दिसताच तो आनंदाने उडी मारून खेळण्यास सज्ज होतो.