Join us

पु. लं.ची भूमिका साकारल्यानंतर सागर देशमुख साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 11:18 AM

भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून  इतिहासाचं हे सोनेरी पान उलगडलं जाणार आहे.

एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरील सिनेमा किंवा मालिका रसिकांना विशेष भावतात त्यांना रसिकांकडून चांगला प्रतिसादही मिळतो. त्यामुळे लवकरच छोट्या पडद्यावर आता आणखी एका व्यक्तीमत्त्वाचं जीवनचरित्र उलगडणार आहे. ते व्यक्तीमत्त्व म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून  इतिहासाचं हे सोनेरी पान उलगडलं जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरतात. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूने ‘स्टार प्रवाह’ने या मालिकेची निर्मिती केली आहे.

अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय. या भूमिकेविषयी सांगताना ते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. बाबासाहेबांचं कर्तुत्व खरच महान आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मला नव्याने आंबेडकर उलगडत आहेत. एक अभिनेता म्हणून मी श्रीमंत होतोय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.’  या आधी सागरने भाई-व्यक्ती की वल्ली सिनेमातून महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचे विशेष कौतुकही झाले होते. 

सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. महामानवाचं हे महानकार्य मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.