'बायकांना कॉमेडी जमत नाही', या जुन्या विचारसरणीलाच छेद देत आपल्या कॉमेडीने महाराष्ट्रातच नाहीतर जगभर मराठी माणसाच्या मनात घर करणारी अभिनेत्री, नम्रता संभेराव. (Namrata Sambherao) लॉली, इन्सपेक्टर, आजीबाई किती भूमिका ती समरसून जगते आणि त्यात कॉमेडीचे असे काही रंग भरते की तिच्या कलेचं कौतुक वाटावं. नम्रताने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत तिने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. आज नम्रताचा वाढदिवस आहे.
नम्रतानं शिवाजी विद्यालय काळाचौकी, येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं. शाळेमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. नृत्य, गायन, एकपात्री अभियन, शुद्धलेखन अशा सगळ्या उपक्रमांमध्ये ती सहभागी व्हायची. नववीत असताना पहिल्यांदा बाजीराव मस्तानी मधल्या मस्तानीचा एकपात्री अभिनय परफॉर्म केला. तिथे तिला दुसरं प्राईज मिळालं. तेव्हाच तिला जाणवलं खरंच आपणही अभियन क्षेत्रात काहीतरी करू शकतो. नम्रताच्या वाढदिवसा निमित्त हास्यजत्रा फेम समीर चौगुलेंनी तिच्याबाबत एक खास पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
समीर चौघुले यांची पोस्टNamrata Yogesh Sambherao happy birthday.....one of the finest actress i have ever seen...हिच्या अभिनयाचा थांगच लागत नाही....हिच्या प्रतिभेत डोकावल तरी आत काय आणि किती दडलंय याचा अंदाज घेता येत नाही ...हेच टॅलेंट असतं का? तर नाही..हा आहे आशिर्वाद जो कोणत्याही उपदेवाला किंवा प्रोबेशनवर असलेल्या देवदूताला मध्ये न घेता देवाने डायरेक्ट दिलेला आहे.. नमा तू अद्वितीय आहेस कमाल आहेस आणि सर्वात महत्त्वाचं तू आमची आहेस..बास विषय कट......तुला वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा.....
दरम्यान नम्रताने 'पुढचं पाऊल', 'लज्जा', 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजले.