टीव्ही अभिनेता समीर शर्माने गळफास घेऊन आत्महत्या केली. घराच्या किचनमध्ये त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घरातून दुर्गंधी यायला लागल्याने शेजा-यांना संशय आला आणि यानंतर समीरने आत्महत्या केल्याचे समोर आले. समीरने मृत्यूपूर्वी कुठलीही सुसाईड नोट मागे सोडलेली नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूच्या कारणांचा खुलासा झालेला नाही. पण समीर नैराश्यात होता, याचे संकेत मात्र त्याने स्वत: त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिले होते.
27 जुलैला समीरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. त्यावरून तो एकाकी होता, नैराश्यात होता, असे जावणते. या पोस्टमध्ये त्याने मृत्यूचे संकेत दिले होते. ‘मी माझी चिता रचली आहे आणि त्यावर झोपलोय. माझ्या आगीने ती जळतेय,’ अशा ओळी लिहिलेला फोटो त्याने पोस्ट केला होता.
समीरने 27,28 आणि 29 जुलै अशा सलग तीन दिवस सोशल मीडियावर डिप्रेसिव्ह फोटो शेअर केले होते. 28 व 29 जुलैला त्याने समुद्राचे फोटो शेअर केले होते. याला त्याने कुठलेही कॅप्शन दिले नव्हते. समीर विवाहित होता. मात्र पत्नीपासून वेगळा राहत होता. त्याचे लग्न अचला शर्मासोबत झाले होते. काही काळापासून दोघे वेगळे राहत होते. समीर मूळचा दिल्लीचा होता. समीरने अनेक मालिकांमध्ये काम केलेय. कहानी घर घर की, क्यों की सांस भी कभी बहू थी, इस प्यार को क्या ना दूं, ज्योती अशा अनेक मालिकांमध्ये तो दिसला होता.