मराठी थिएटर, मालिका, चित्रपट ही अभिनयाची क्षेत्रं पादाक्रांत करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभूणे यांनी छोटया पडदा गाजवला. अनेक पुरस्कारांच्या मानकरी देखील त्या झाल्या. मात्र, पुरस्कार मिळाल्यानंतरही अभिनयातील ‘मी’ पणा हरवू न देता त्या कार्यरत आहेत. आता त्या झी टीव्हीवरील ‘तुझसे हैं राब्ता’ या हिंदी मालिकेत अहिल्या देशमुख यांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेविषयी आणि आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
* ‘तुझसे हैं राब्ता’ या मालिकेत तुम्ही दिसत आहात. काय सांगाल तुमच्या व्यक्तिरेखेविषयी?- झी टीव्हीवर सायंकाळी ८:३० वाजता ‘तुझसे हैं राब्ता’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. या मालिकेतून मी अहिल्या देशमुख या अत्यंत आगळयावेगळया भूमिकेत मी दिसत आहे. मी आत्तापर्यंत आईच्या भूमिका साकारल्या असून यात मी कणखर, खंबीर अशा सासूची भूमिका साकारत आहे. हे मध्यवर्ती पात्र आहे. अहिल्या देशमुख यांचा पैठणीचा व्यवसाय असून त्यांचा गावात मान, प्रतिष्ठा आहे, असे हे साधारण पात्र आहे.
* मालिकेचे कथानक आणि वेगळेपण काय सांगाल?- ही एक भावनिक कथा आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे कथानक यात आहे. ही गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी खात्री आहे. गोष्टीच्या माध्यमातूनच ते उलगडत जाणे अपेक्षित असल्याने त्यातच खरी मजा आहे. ‘राब्ता’ म्हणजे नातं. हे नातं रक्ताच्या नात्याचं आहे की, ओळखीच्या नात्याबद्दल यात सांगण्यात आलं आहे, हे पडद्यावरच उलगडेल. झी वाहिनीचा कायम असा प्रयत्न असतो की, ते नातेसंबंधांवर प्रकाश टाकण्याचा कायम प्रयत्न करत असतात.
* मालिकेतील भूमिकेसाठी काही विशेष तयारी करावी लागली का?- हो अर्थातच. कारण मी आत्तापर्यंत ज्या भूमिका केल्या आहेत त्यात मी अत्यंत सर्वसाधारण अशा घरातील स्त्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, या मालिकेत मी एका कर्तुत्ववान अशा महिलेची भूमिका साकारतेय, जी घर, वाडा सांभाळणारी आहे. तिला महाराष्ट्रीयन साडी, चंद्रकोर, नथ असा एकंदरित महाराष्ट्रीयन पेहराव माझा दाखवण्यात आलेला आहे. झीच्या मालिका या भारत आणि भारताबाहेर देखील बघितल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्रीयन संस्कृती जास्तीत जास्त प्रमाणात पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.
* तुम्ही जवळपास ९२ पासून अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहात. कसं वाटतंय आज मागे वळून बघताना?- खरंतर खूप छान वाटतंय. मी मराठी नाटकांपासून माझ्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून मी प्रेक्षकांसमोर येऊ लागले. मग प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद माझ्या मालिकांना मिळू लागला. खूप शिकायला मिळालं आणि मग डेली सोप्सचा जमाना आल्याने मलाही अनेक आॅफर्स येऊ लागल्या.
* छोटया पडद्याची आई म्हणूनच तुम्हाला ओळखलं जातं. कधी ओझं वाटलं का या आई असण्याच्या जबाबदारीचं?- नाही. आईची भूमिका साकारण्याचं ओझं वाटत नाही. खरंतर आई असली तरी घराघरातील आई ही वेगळी असते. प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. गोष्टीतील आई रंगवताना मला मजा येते. छान वाटतं की, आपल्याला एवढं सुंदर नातं जगायला मिळतंय. आता मी अहिल्या या अनुप्रियाच्या सासूची भूमिका करतेय तर ही देखील भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री आहे.
* तुम्ही बऱ्याचशा चित्रपटांतही काम केलं आहे. कोणता फरक जाणवतो मालिका आणि चित्रपटात काम करताना?- खरंतर मालिकेचा आवाका खूप मोठा असतो. चित्रपटांचं तसं होत नाही. दोन्हीही प्रकार हे आपापल्या जागी वेगळेपणा सिद्ध करतात. मालिकेसाठी वेळेचं भान ठेवावं लागतं तर चित्रपटासाठी शूटिंग करताना काही वेगळेपणा करावा वाटला तर करता येतो. पण मालिकेचे तसे होत नाही.
* पवित्र रिश्ता आणि कुसुम या दोन मालिकांतील तुमच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. तुम्हाला पवित्र रिश्तासाठी अॅवॉर्डही मिळाले आहेत. कसं वाटतं जेव्हा एखाद्या कलाकाराचं असं कौतुक होतं तेव्हा?- एखादी कलाकृती पूर्ण करत असताना त्यासाठी लागणारी संपूर्ण टीमच मेहनत करत असते. अशावेळी प्रेक्षक जेव्हा मालिकेबद्दल कौतुक करतात तेव्हा ती प्रतिक्रिया आमच्यासाठी पुरस्कारापेक्षाही जास्त महत्त्वाची असते. पण, अर्थात सोहळयात मिळणारा पुरस्कार हा मिळाला की आनंद तर होतोच.
* छोटया पडद्याला तुमच्या करिअरमध्ये किती स्थान आहे?- खूपच. कारण मी ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’ मधून शिक्षण घेतले असल्याने मराठी थिएटर बरेच वर्ष केले. त्यानंतर मी मराठी मालिकांकडे वळले. मग माझ्या करिअरला चांगलेच वळण मिळाल्याने छोटया पडद्याला मी माझ्या आयुष्यात प्रचंड स्थान देते.
* कलाकाराच्या आयुष्यात थिएटरचं किती महत्त्व असतं?- थिएटरमुळे खूप शिकायला मिळते. तिथे नाट्यवाचन होतं. आम्ही दिग्दर्शकांसोबत चर्चा करतो. लगेचच आम्हाला आमच्या कामाची पोचपावती मिळते. त्याचा उपयोग पुढील कारकिर्दीत होतोच.
* तुमच्या मते, अभिनय म्हणजे काय आहे?- अभिनयाची व्याख्या ही एका वाक्यात होणारी नाहीच. मला असं वाटतं की, आम्ही कलाकार प्रत्येक दिवशी घेत असलेला अनुभव जाणीवपूर्वक मांडणं म्हणजेच अभिनय.
* अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी अनेक स्ट्रगलर्स धडपड करत असतात. कोणता संदेश द्याल त्यांना?- हे खूप चांगले क्षेत्र आहे. या क्षेत्रात प्रचंड स्कोप आहे. अनेक नवीन चॅनेल्स, प्रकार सुरू झाले आहेत. मराठी चित्रपट, नाटके ही वेगवेगळया प्रकारची लाँच होत आहेत. मात्र, ग्लॅमरबरोबरच इथे प्रचंड मेहनत देखील घ्यावी लागते. वास्तवाचं भान ठेऊन अभिनयक्षेत्रात या, असे मी त्यांना सांगेन.