मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. 'जय माँ लक्ष्मी' मालिकेच्या सेटवर निर्मात्याने अभिनेत्याला मारहाण केल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आलीय. टीव्ही अभिनेता शान मिश्राने 'जय माँ लक्ष्मी' मालिकेच्या निर्मात्यांवर मारहाणीचा गंभीर आरोप करुन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सेटवर भांडण झाल्यावर निर्मात्याने मारहाण करुन दुर्व्यवहार केल्याचा आरोप अभिनेत्याने केलाय.
नेमकं प्रकरण काय?
टेली टॉकच्या रिपोर्टनुसार, 'जय माँ लक्ष्मी' मालिकेत भगवान विष्णुची भूमिका साकारणारा अभिनेता शान मिश्राने मालिकेच्या मेकर्सना विनंती केली होती की, त्याला शूटिंगमधून लवकर सोडण्यात यावं. कारण अभिनेत्याच्या हाताला दुखापत झाली होती. अभिनेता शानच्या डॉक्टरांनीही त्याला शूटिंग करु नये, असं सांगितलं होतं. तरीही कामाप्रती गांभीर्य दाखवत शानने २ तास शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. एपिसोड टेलिकास्ट व्हायला कोणतीही अडचण येऊ नये हा यामागे उद्देश होता. परंतु त्यानंतरही 'जय माँ लक्ष्मी' मालिकेचे निर्माते आणि पत्नीने अभिनेत्याला मारहाण केली.
निर्मात्यांनी केली मारहाण
'जय माँ लक्ष्मी' मालिकेच्या निर्मात्यांनी आणि त्यांच्या पत्नीने शानसोबत भांडण केलं. जेव्हा अभिनेत्याने निर्मात्यांना प्रत्युत्तर दिलं तेव्हा दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. शिवाय जबरदस्तीने शानची मान पकडण्याचा प्रयत्न केला. यासंबंधी एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत अभिनेता शानवर मालिकेचे निर्माते आणि त्याची पत्नी जोरात ओरडताना दिसत आहेत.
निर्मात्याची पत्नी अभिनेत्याला म्हणते की, "जे करायचं ते कर. काम करुनच निघायचं. तू मला काय शहाणपणा दाखवतोयस. रोज इथे येऊन खेळतोस." अशा शब्दात निर्मात्याची पत्नी अभिनेत्याला फटकारताना दिसत आहेत. या प्रकरणी शान किंवा मालिकेचे निर्माते अन् त्यांच्या पत्नीचं अधिकृत वक्तव्य समोर आलं नाहीये.