Join us

Sharad Ponkshe : "मी आता मिठाई विकतो..."; शरद पोंक्षेंनी सुरू केला नवा व्यवसाय, सांगितला मजेशीर किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 3:18 PM

Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंनी आपल्या नव्या व्यवसायाबद्दलही माहिती दिली आहे. रसिक वाचक-ठाणे यांनी आयोजित केलेल्या ‘ग-गप्पांचा’ या कार्यक्रमामध्ये पोंक्षे यांनी हजेरी लावली होती.

अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. वेगवेगळ्या घडामोडींवरील तसेच विषयांवरील ते आपली मतं सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टची तुफान चर्चा रंगते. याच दरम्यान आता शरद पोंक्षेंनी आपल्या नव्या व्यवसायाबद्दलही माहिती दिली आहे. रसिक वाचक-ठाणे यांनी आयोजित केलेल्या ‘ग-गप्पांचा’ या कार्यक्रमामध्ये पोंक्षे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी "मी आता मिठाई विकतो..." असं म्हणत मजेशीर किस्सा सांगितला आहे. 

"कोरोना काळामध्ये मनोरंजन क्षेत्राची खूप वाताहात झाली होती. 2019 हे वर्ष माझ्यासाठी खूप खराब होतं. कॅन्सरमुळे आधीच बँक बॅलन्स संपला होता. जरा कुठे काम सुरू झालं आणि सात महिन्यांमध्येच कोरोनाला सुरुवात झाली. घर चालवण्यासाठी हाती पैसे असावे म्हणून कायतरी केलं पाहिजे यासाठी विचार केला. त्यानंतर आम्ही चार-पाच मित्र एकत्र आलो. चितळे बंधू यांना मी भेटलो. त्यानंतर मी चितळे एक्सप्रेस सुरू केलं."

"शुटिंग नसतं तेव्हा मी दुकानामध्ये बसतो, हा अनुभव खूप भन्नाट आहे"

"बोरिवली व डोंबिवलीला दोन दुकानं सुरू केली. चितळेंची शाखा आम्ही या दोन ठिकाणी सुरt केल्यानंतर माझे दोन सहकारी डोंबिवलीचं दुकान सांभाळू लागले. मी बोरिवलीच्या दुकानाचं काम पाहतो. मी आता मिठाई विकतो" असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. तसेच "शुटिंग नसतं तेव्हा मी दुकानामध्ये बसतो. हा अनुभव खूप भन्नाट आहे. दुकानामध्ये असताना बऱ्याच स्त्रिया आतमध्ये येतात. कारण मिठाईच्या दुकानात पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रिया फार उत्साहाने खरेदी करायला येतात."

"मला दुकानात पाहिल्यावर स्त्रियांची कुजबूज सुरू होते. हे शरद पोंक्षे आहेत का? मी ही सगळी चर्चा ऐकत असतो. नंतर घाबरत घाबरत मला बोलतात तुम्ही शरद पोंक्षे यांच्यासारखे दिसता. मग मीदेखील कधी कधी मूडमध्ये असलो की त्यांना विचारतो कोण शरद पोंक्षे? माझा स्टाफ यावर हसतो. खूप गमतीजमती चालतात, काय काय जणी खूप हसतात. आम्ही गमतीने म्हणतो दोन लाडवांचं पॅकेट घेतलं की एक सेल्फी फ्री" असं म्हणत शरद पोंक्षेंनी त्यांना आलेला अनुभव शेअर केला आहे.  

टॅग्स :शरद पोंक्षे