अभिनेत्री सारा श्रवणने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. पिंजरा या मालिकेतील तिच्या भूमिकेची तर चांगलीच चर्चा रंगली होती. छोट्या पडद्यावरील तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या एका व्यक्तीला नुकतेच पोलिसांनी अटक केले आहे. या व्यक्तीचे नाव सुभाष यादव असून त्याचे वय २७ वर्षं आहे. ही घटना पुण्यात घडली असून पुण्यातील वानवडी येथील पोलिस चौकीत याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सारा ही मुंबईत राहात असून तिने पुण्यातील वानवडी पोलिस चौकीत सुभाष यादव विरोधात तक्रार नोंदवली आहे. तिने फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून एका मराठी चित्रपटाचे राज्यातील विविध भागात चित्रीकरण सुरू होते. याच दरम्यान सुभाष यादवने संबंधित अभिनेत्रीशी लगट करण्याच्या उद्देशाने अनेकदा फोन केला. त्यावर साराने त्याला कधीच प्रतिसाद दिला नाही. तरीही सुभाषने तिचा पिच्छा सोडला नाही. तो सतत तिचा पाठलाग करत असे. एवढेच नव्हे तर साराची बदनामी करण्याची धमकी देखील सुभाष यादवने तिला दिली होती. त्यामुळे यादवला समज देण्यासाठी तिने पुण्यातील चतुःश्रुंगी मंदिर परिसरात त्याला बोलावले होते. पण तिथे देखील त्याने तिला पुन्हा एकदा तिची बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे साराच्या ड्रायव्हरने तातडीने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी काहीच वेळात तिथे जाऊन सुभाष यादवला पांडव नगर पोलिस चौकीत नेले. आता हे प्रकरण हाताबाहेर जात आहे हे सुभाष यादवच्या लक्षात येताच त्याने पोलिसांसमोर साराची माफी मागितली. त्यामुळे तिथे त्यावेळी पोलिसांकडे तक्रार दाखल केली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून त्याने साराला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली.
एवढेच नव्हे तर त्याने पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्याच्या लेडीज वॉशरुममध्ये साराशी पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न केला असा आरोप साराने लावला आहे. त्यामुळे सुभाषविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष यादवने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.