मी मूळचा नागपूरचा, पण माझा नागपूर ते मुंबई प्रवास पुणे मार्गे झाला. मी २००६ साली अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी पुण्यात दाखल झालो. तसा मी नागपुरातही लहानपणापासून स्थानिक पातळीवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाटकांत काम करायचो. त्यामुळे पुण्यात आल्यावरही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये हिरिरीने भाग घेऊ लागलो. विशेषतः पुरुषोत्तम करंडक आणि फिरोदिया करंडक या महाराष्ट्रातील मानाच्या स्पर्धांमध्ये मी २०११ साली सर्वोत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकं मिळवली आणि तीच माझ्या मुंबई प्रवेशाची किल्ली ठरली.
मूळचे पुणेकर असलेल्या श्रीरंग गोडबोले सरांच्या पुढाकाराने मला माझी पहिली मालिका मिळाली, पण त्याचं शूटिंग सर्व पुण्यातच होत होतं. त्यानंतर मला अधिकाधिक कामं मिळू लागली. ज्यासाठी मला मुंबई येणं क्रमप्राप्त होतं. मुंबईत आल्यावर सर्वांत आधी ‘जेव्हीएलआर’वर एका चाळसदृश वस्तीमध्ये मी छोटीशी जागा भाड्याने घेतली होती. तिथे पावसाळ्यात प्रचंड पाणी साचायचं. घरातून बाहेर जाणं-येणं देखील कठीण होऊन बसायचं, पण त्याकाळी तेवढंच परवडण्यासारखं होतं. तिथे कसाबसा काहीकाळ काढल्यानंतर मात्र मी जवळच ग्रीन फिल्डमध्ये शिफ्ट झालो.
मी मुळात स्वभावाने मितभाषी असल्याने फारसा फिल्मी पार्ट्यांना जात नसे, पण माझ्या कामाच्या निमित्ताने ज्या काही ओळखी झाल्या आहेत त्याच्या जोरावर मी पुढे पुढे जात आहे. इथे तुम्ही स्वतःच स्वतःला अनुभवातून घडवणं फार महत्त्वाचं असतं, जे मी प्रामाणिकपणे करतोय.
मुंबई शहर हे सर्वसमावेशक आहे. इथे येणाऱ्या सर्वांना ते आपल्यात सामावून घेतं. इथली सकारात्मक ऊर्जा मला खूप भावते. जगातल्या इतर कुठल्याही शहरापेक्षा इथलं वर्क कल्चर मस्त आहे. इथे तुम्ही कोणालाही कुठलंही काम सांगा. ‘हो जायेगा’ हे उत्तर मिळतं. असं इतर कुठल्या शहरांत होतं हो?
मला माझ्या नाटकाच्या तालमींसाठी दादरला जायचं असायचं. जवळ फारसे पैसे नसल्यामुळे लोकलशिवाय पर्याय नव्हता, पण लोकलच्या धकाधकीच्या प्रवासाने संध्याकाळपर्यंत पार थकायला व्हायचं. मला व्यायामाची खूप आवड आहे. नियमित व्यायामाने शरीर बळकट करणे हे माझ्या क्षेत्रात काम करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, पण दिवसभराच्या प्रवासाने शिणवठा आल्याने माझ्याने व्यायामही होत नव्हता. मुंबई शहराच्या वेगाशी ॲडजस्ट व्हायला मला तब्बल दीड वर्ष लागलं. - शब्दांकन : तुषार श्रोत्री