कलाकारांचा अप्रतिम अभिनय आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कथा यामुळे ‘झी टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मालिकेत जरी अक्षत जिंदाल (निशांतसिंह मलकाणी) आणि इन्स्पेक्टर पर्व (रीहान रॉय) हे एकमेकांचे शत्रू असले, तरी वास्तव जीवनात दोघांमध्ये निखळ मैत्रीचं घट्ट नाते विणले गेले आहे. हे दोघे सेटवर नेहमी एकत्रच दिसतात.
ख्रिस्तमसचा सणाचे निमित्त साधून निशांत आणि रीहान या दोघांनी एक नवा निर्णय घेतला आणि हे उत्सवी दिवस साजरे करण्यासाठी आपल्या सहकलाकारांना स्वादिष्ट खाद्यपदार्थ खिलविण्याचा चंग बांधला होता. निशांतने आपले बेकिंगमधील कौशल्य पणाला लावलं; तर रीहानला साधेपणा आवडत असल्याने त्याने आपल्या खमंग भज्यांसारखी देशी पाककृती तयार केली.
यासंदर्भात निशांतसिंह मलकाणी म्हणाला, “टीव्ही उद्योगात कार्यरत असलेल्या अभिनेत्यांना स्वत:साठी फारच थोडा वेळ मिळतो. पण मला जेव्हा केव्हा असा मोकळा वेळ मिळतो, तेव्हा मी माझं पाककौशल्य पणाला लावून माझ्या सहकलाकारांना काहीतरी खायला घालतो. आता उत्सवी दिवस असल्याने मी केक बनविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मी नेटवर साधा केक तयार करण्याच्या पाककृती आणि ‘डू इट युवरसेल्फ’चे व्हिडिओ पाहिले. त्यामुळे मी केवळ माझं पाककौशल्य घासूनपुसून नवं केलं असं नाही, तर माझे मित्र आणि सहकलाकारांनाही एक उत्तम पदार्थ खाऊ घातला. माझ्यासाठी तो नक्कीच एक संस्मरणीय अनुभव होता.”
हान रॉय म्हणाला, “लहान असल्यापासून मी माझ्या आईला जेवण बनविताना पाहात असे. मी तिच्याकडून काही मूलभूत पदार्थ कसे तयार करायचे, ते शिकून घेतलं होतं. जेव्हा सेटवरील सहकलकरांना काहीतरी चविष्ट पदार्थ खायला घालूया, अशी कल्पना निशांतने मांडली, तेव्हा मलाही ती पसंत पडली आणि आम्ही दोघांनी काही लज्जतदार पदार्थ सर्वांना खाऊ घातले.”
ता मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना काही नाट्यमय प्रसंग पाहायला मिळतील. ख्रिस्तमसनिमित्त आयोजित एका पार्टीत जिंदालच्या तिन्ही सुना- दुर्गा (श्वेता महाडिक), लक्ष्मी (सेहरिश अली) आणि सरस्वती (रश्मी गुप्ता) या गुड्डनच्या (कनिका मान) वडिलांचा अपमान करतात, ज्यामुळे गुड्डन जिंदाल हाऊस सोडून जाते. अक्षत तिला पुन्हा घरी आणण्यात यशस्वी होतो का? गुड्डन आणि अक्षत यांच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले आहे? अशा सगळ्या रंजक गोष्टी मालिकेत पाहायला मिळणार आहे.