गायत्री दातार (Gayatri Datar) मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'तुला पाहते रे' मालिकेतून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेतून ती घराघरात पोहचली. त्यानंतर ती बिग बॉस मराठी शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमधून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या शोनंतर ती 'अबीर गुलाल' मालिकेत पाहायला मिळाली होती. या मालिकेनंतर तिचे चाहते तिला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर तिच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ती लवकरच एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हो, हे खरंय. गायत्री दातार लवकरच झी मराठीवरील नवीन कार्यक्रमातून भेटीला येत आहे. या शोचं नाव आहे 'चल भावा सिटीत'. झी मराठीने इंस्टाग्रामवर 'चल भावा सिटीत' शोचा प्रोमो शेअर केला आहे. यातून गायत्री या शोमध्ये सहभागी होणार असल्याचे समजते आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ड्रामा करण्यात माहीर असलेली सिटी सुंदरी गायत्री येतेय तुमच्या भेटीला! नवा कार्यक्रम 'चल भावा सिटीत' १५ मार्चपासून दररोज रात्री ९.३०.
'चल भावा सिटीत' हा शो ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील स्पर्धकांना एकत्र आणणार आहे. या स्पर्धकांना अशा आव्हानांना सामोरे जावे लागेल जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास प्रवृत्त करेल. ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील, आणि त्यांना आव्हान देतील. चल भावा सिटीत हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दर्शवेल. सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईलच.