'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये पहिल्या दोनच दिवसांत निक्की तांबोळी-वर्षा उसगावकर यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. यावेळी बेडवर झोपण्यावरुन निक्कीने वर्षा यांचा अपमान केला. इतक्या मोठ्या अभिनेत्रीचा अपमान केल्यामुळे निक्कीवर महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून टीका होत आहे. यावर ज्येष्ठ मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेंनी त्यांचं मत व्यक्त केलंय. किशोरी शहाणेही 'बिग बॉस मराठी २' मध्ये सहभागी होत्या.
किशोरी शहाणे वर्षा उसगावकरांच्या अपमानाबद्दल काय म्हणाल्या
किशोरी शहाणे लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या की, "अपमान करायला नाही पाहिजे. निक्कीसाठी हे चुकीचं असेल. पण वर्षानेही आता स्ट्रॉंगली उभं राहिलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तिने हललं नाही पाहिजे. या गोष्टी होणार. प्रत्येकाला शेवटी दुसऱ्याला बाहेर काढायचंय जिंकण्यासाठी. जिंकणार कसं नाहीतर! एकमेकांचा उदो उदो करत बसलात तर तुम्ही जिंकणार कसं. बिग बॉस हा एक वैयक्तिकरित्या खेळायचा गेम आहे. तो एक सायकोलॉजिकल गेम आहे. ज्यांनी त्या गेमचं व्यवस्थित निरीक्षण केलं त्यांना त्या खेळात उत्सुकता निर्माण होईल. मी पण बिग बॉस गेमची फॅन झालीय."
वर्षा उसगावकर-निक्कीमध्ये का झालं भांडण?
अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि निक्कीमध्ये बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनच्या पहिल्याच दिवशी कडाक्याचं भांडण झालं. झालं असं की, बिग बॉसने सर्व स्पर्धकांना लिव्हिंग एरियात बोलावलं होतं. त्यावेळी वर्षा उसगावकर मेकअप करत बसल्या होत्या म्हणून निक्कीने त्यांच्यावर राग काढला. पुढे वर्षा उसगावकर अनावधानाने बेडवर बसल्या होत्या. त्यामुळे बिग बॉसने सर्वांना एक आठवडा बेडवर न झोपण्याची शिक्षा सुनावली. "तुम्ही तंगड्या वर करुन बसल्या होत्या", "अक्कल नाही", अशा वाईट शब्दात निक्कीने वर्षा उसगावकरांचा अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी कमेंट करुन निक्कीवर संताप व्यक्त केला.