Join us

व्यक्तिरेखा जगायला आवडते-अभिनेत्री मृणाल दुसानीस

By अबोली कुलकर्णी | Updated: October 10, 2018 18:36 IST

अभिनेत्री मृणाल दुसानीस ‘सुखाच्या सरींनी...हे मन बावरे’ या मालिकेतून छोटया पडद्यावर कमबॅक करणार आहे. अनुश्री आणि सिद्धार्थ म्हणजेच मृणाल दुसानीस आणि शशांक केतकर यांची सुंदर लव्हस्टोरी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

निरागस चेहरा अन् चेहऱ्यावर कायम विलसणारं स्मित असं वर्णन ऐकताच अभिनेत्री मृणाल दुसानीस हिचा चेहरा डोळयासमोर आल्याशिवाय राहत नाही. पडद्यावर ठामपणे स्वत:ची भूमिका मांडणं, ती व्यक्तिरेखा जगणं हेच तिच्या अभिनयाचं खरं वैशिष्ट्य आहे. कलर्स मराठीवरील ‘अस्सं सासर सुरेख बाई’ मालिकेत तिने जुईची भूमिका साकारली. प्रेक्षकांना तिची जुईची व्यक्तिरेखा प्रचंड भावली. आता ती ‘सुखाच्या सरींनी...हे मन बावरे’ या मालिकेतून पुन्हा छोटया पडद्यावर कमबॅक करणार आहे. अनुश्री आणि सिद्धार्थ म्हणजेच मृणाल दुसानीस आणि शशांक केतकर यांची सुंदर लव्हस्टोरी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने तिच्यासोबत केलेला हा संवाद...

* सुखाच्या सरींनी..हे मन बावरे या मालिकेतून तू पुन्हा एकदा कलर्स मराठीवर कमबॅक करत आहेस. कसं आहे अनुश्रीचं कॅरेक्टर?- मध्यमवर्ग कुटुंबामधील अनुश्री ही अत्यंत स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे, जिचे आपल्या  कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे. अनुश्री सगळ्या घराचा भार स्वत:च्या खांद्यावर घेऊन कुटुंबाचा सांभाळ  हसतमुखाने करते आहे. ‘जेव्हा परिस्थिती बदलता येत नाही, तेव्हा मनस्थिती बदलावी’ असे अनुचे आयुष्याबद्दलचे मत आहे. मी या भूमिकेसह कमबॅक करत आहे, याचा मला आनंदच होत आहे.

* शशांक आणि तू प्रथमच स्क्रिन शेअर करत आहात. काय सांगशील?- नक्कीच. शशांक आणि माझी जोडी प्रेक्षकांना आवडतेय ही चांगली बाब आहे. प्रोमोला देखील चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शशांक हा एक खूपच चांगला अभिनेता आहे. त्याच्यासोबत काम करत असताना कम्फर्टेबल वाटतं.

*  राजेश मापुस्कर यांनी मालिकेच्या शीर्षक गीताचे दिग्दर्शन केले आहे. कसा आहे अनुभव?- होय, नक्कीच खूपच चांगला अनुभव आहे. या निमित्ताने त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांनाही  हे गाणं प्रचंड आवडतंय, खूप लाइक्स या गाण्याला मिळत आहेत, त्यामुळे मी खूप खूश आहे.

* मालिकेत विवेक लागू, वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे  यांसारखी तगडी स्टारकास्ट आहेत. कसं वाटतंय?- नुकतेच मालिकेचे शूटिंग सुरू केले आहे. हळूहळू सगळयांच्या ओळखी होत आहेत. बघूया, जशी शूटिंग सुरू होईल, तशी मजा येणार याची खात्री आहे. अनेक गोष्टी शिकायलाही मिळतील, यात शंकाच नाही.

* तू साकारलेली जुई आणि अनू या दोन्ही व्यक्तिरेखा परस्परविरोधी आहेत. काय सांगशील?- खरंतर या दोन्ही व्यक्तिरेखा वेगवेगळया असल्या तरीही छान मजा येते जेव्हा अशा भूमिकांच्या आॅफर्स येतात तेव्हा. नवीन आव्हान आणि नव्या जबाबदाऱ्या  एक कलाकार म्हणून सांभाळायला छान वाटतं.

* तुझी प्रेमाबद्दलची व्याख्या काय?- ज्या व्यक्तीसोबत तुम्ही कम्फर्टेबल असता तो व्यक्ती तुमच्यासाठी जवळचा असतो. त्याच्यासमोर तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावं लागत नाही. तुम्ही जसे असता तसे ते तुम्हाला स्विकारतात. त्याग, समर्पण, स्वतंत्र स्पेस, समजूतदारपणा हे सगळं दोघांमध्ये असलंच पाहिजे. एकमेकांना पाठिंबा देणं, प्रगती करत असताना वाटचाल करणं हे सगळे खऱ्या  प्रेमाची लक्षणं आहेत.

* मालिका म्हटल्यानंतर रोज शूटिंग करावं लागतं. मग स्वत:साठी वेळ कसा काढतेस?- सध्या तरी आता शूटिंग सुरू झालं आहे. शूटिंग हेच आमचं आयुष्य बनलं आहे. त्यामुळे आता बघूया की कसा वेळ मिळतोय ते? वेळेचं नियोजन करावं लागेल. त्यामुळे मी वेळ काढेल आणि तो प्रत्येक कलाकाराने काढायलाच हवा. 

* फावल्या वेळात तुला काय करायला आवडतं?- फावल्या वेळात मला गाणी ऐकायला आवडतं. आई-वडील, सासू-सासरे यांच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतं. चांगली पुस्तकं वाचायला आवडतात.  

* इंडस्ट्रीत नवनवीन प्रयोग होत आहेत, नवीन थीम्स समोर येत आहेत. काय सांगशील या नव्या बदलाविषयी?-  नक्कीच स्वागतार्ह आहे. या प्रोजेक्टचा मी भाग आहे त्याचा मला अभिमानच वाटतोय. आता जेव्हा मी काम करायला सुरूवात केली आहे. तेव्हा जाणवते की, अजून आपल्याला बरंच काम करायचं आहे. 

टॅग्स :मृणाल दुसानीसहे मन बावरेकलर्स मराठीशशांक केतकर