नवरात्रौत्सवानिमित्त लोकमत फिल्मीने 'नवदुर्गा' या उपक्रमाअंतर्गत सोनी मराठीची क्रिएटिव्ह डायरेक्टर सोहा कुळकर्णींसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. सोहा कुळकर्णींची आई नीना कुळकर्णी आजही मनोरंजन क्षेत्रात सक्रीय आहेत. सोहाचे बाबा दिलीप कुळकर्णी हे सुद्धा अभिनेते-दिग्दर्शक होते. सोनी मराठी चॅनलची क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळताना सोहा यांना काय आव्हानं आली? त्यांचं काम नेमकं काय असतं? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सारख्या शोमागे काय विचार होता? याविषयी सोहा यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
>>> देवेंद्र जाधव
१. सोनी मराठीची क्रिएटिव्ह डायरेक्टर होण्याची संधी कशी मिळाली?
मी गेली १८ वर्ष मीडियामध्ये काम करतेय. सुरुवातीला मी संजय सूरकर यांना असिस्ट केलं. याशिवाय चित्रा पालेकर यांच्या 'मातीमाय' सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. ठरवून काही झालं नाही. डेली सोपचा एक काळ सुरु झाला होता. एकता कपूर यांच्या 'बालाजी टेलिफिल्म्स'साठी मला संधी मिळाली. त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करत होते. टेलिव्हिजनचा मला चस्का लागला. अर्ध्या तासात गोष्ट सांगण्याचा टेलिव्हिजचा फॉरमॅट मला खूप इंटरेस्टिंग वाटला. पुढे मी Advertising मध्ये शिक्षण घेतलं. माझी हिंदीपासून सुरुवात झाली. 'कसौटी जिंदगी के', 'कयामत' या मालिकांवर मी काम करत होते. हे विश्व वेगळं होतं. हे मला इंटरेस्टिंग वाटलं त्यामुळे मी पुढे जात गेले. नंतर मग झी मराठीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आपण काय ब्रॉडकास्ट करायचं याचा पाया मला झी मराठीमध्ये शिकायला मिळाला. आपण जसं काम करतो तसं आपलं नाव होतं आणि ओळख तयार होते. पुढे मग तशा संधी मिळत गेल्या. पुढे मग सोनी मराठी हा नवा चॅनल सुरु करायची संधी मिळाली. त्याआधी मी सोनी हिंदीमध्ये (SET) काम करत होते. अर्ध्या तासात गोष्ट सांगणं, ते खेळवतं ठेवणं आणि लोकांच्या मनात त्याबद्दल आपुलकी निर्माण करणं यात खूप मजा आहे. सध्या कंटेंट भरपूर आहे. त्यामध्ये टेलिव्हिजनवर लोकांचं मनोरंजन कसं होईल ते मला बघायचं आहे.
२. महिला म्हणून या क्षेत्रात काम करताना काय आव्हानं येतात?
माझ्या घरात असा फरक कधीच केला गेला नव्हता. माझे वडील या क्षेत्रात होते. माझी आई अजूनही काम करतेय. आमच्याकडे मी आणि माझ्या भावामध्ये कधीच फरक केला गेला नाही. आम्ही दोघंही समानतेत वाढलो. मी सर्वांना समान वागणूक देतेय तर समोरचा पण त्याच दृष्टीकोनातून पाहतो. त्यामुळे मी बाई आहे म्हणून मला वेगळ्या पद्धतीने वागवलं गेलंय असं कधी झालं नाही. किंवा वागवलं गेलं असेल तरीही मला ते कळलं नाही. कोणत्याही फिल्डमध्ये एक बाई लीडर असेल तर ते वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. जे लोक त्या स्त्रीसोबत काम करतात त्यांना इतका फरक पडत नाही. कारण लीडर म्हणून ती बाई त्या लोकांना प्रेरणा देत असते. सो हा दृष्टीकोन आपणच निर्माण करुन आपल्याला तसंच वावरावं लागतं. कुठेही पुरुषांचं वर्चस्व असतंच. पण स्त्रियाही आहेत ना. त्यामुळे समानता होत राहणार आहे.
३. आई-बाबा दोघेही नावाजलेले कलाकार असूनही तुला अभिनय क्षेत्रात जावंसं वाटलं नाही?
मला आणि माझ्या भावाला अभिनय क्षेत्रात जावंसं वाटलं नाही. कारण आम्हाला तसं वेगळ्या पद्धतीने वाढवलं गेलं. माझ्या भावाला स्पोर्ट्समध्ये आणि मला चित्रकलेत रस होता. त्यामुळे आमचे छंद लहानपणीच आम्ही निवडले होते. वडील दिग्दर्शक असल्याने घरात अनेकदा नाटक कसं बसवायचंय किंवा बॅकस्टेजचीच चर्चाच व्हायची. त्यामुळे मला कुतुहल वाटायचं. आता जसं या इंडस्ट्रीला ग्लॅमर आहे तेवढं आम्ही मोठे होत असताना नव्हतं. प्रयोग करणं आणि दौरे हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आई-वडील नाटकात काम करायचे आणि वडील बँकेतही नोकरी करायचे. त्यामुळे असं काही वेगळ्या पद्धतीने बघितलं गेलं नव्हतं.
४. या क्षेत्रात आल्यावर आई-बाबांची प्रतिक्रिया काय होती?
माझे बाबा दुर्देवाने मी कॉलेजमध्ये असतानाच गेले. त्यामुळे मी काय क्षेत्र निवडणार याबद्दल त्यांना कल्पना असेल. परंतु वडिलांच्या मार्गदर्शनाचा अनुभव असा कधी घेतला नाही. आई माझ्याबरोबर सतत होती. आईने मला खूप सपोर्ट केला. एक क्षेत्र म्हणून तुला यात उतरायचं असेल तर तुला स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. त्यासाठी मेहनत, स्ट्रगल तुझा स्वतःचा असणार, असं आईचं म्हणणं होतं. अनेक प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करताना मी नीना कुलकर्णींची मुलगी आहे असा कधी उल्लेख करत नाही. बालाजी टेलिफिल्म्समध्ये काम करताना एकता कपूर यांना सहा-सात महिन्यांनी कळलं की मी नीना कुलकर्णींची मुलगी आहे. प्रवास हा प्रत्येकाचा वेगळा असतो. आपल्या कामामुळेच आपण पुढे जाऊ शकतो. आईने खूप मार्गदर्शन केलंय. मी सुद्धा तिला धीर देत असते. त्यामुळे मी, आई, भाऊ एकमेकांना सल्ला, सूचना देत असतो. अत्यंत आदराने त्याचा स्वीकारही करतो. खरं सांगायचं कर, जर माझ्या आई-बाबांच्या नावांचा वापर केला असता तर तो मला फायदेशीर ठरला नसता. कारण वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं.
५. महिला म्हणून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं किती गरजेचं आहे?
माझे वडील लवकर गेल्याने मी एका वर्कींग मदरला आम्हाला वाढवताना बघितलंय. कुटुंबाचा कोणताही सपोर्ट नसतानाही आई एकटी घर चालवायची. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा. त्यामुळे आपल्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. स्वाभिमान जागा होतो. त्यामुळे माणूस म्हणून आपला विकास होतो. कुटुंंब म्हणून शिकत जाणं हीच गोष्ट आहे. दरवेळी मीडिया बदलत आहेत. ओटीटी आलंय. कोवीडनंतर एक वेगळा काळ होता. कोवीड संपल्यावर टीव्हीचं विश्वही बदललं. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून आई, आणि मेकर्स म्हणून मी आणि माझा भाऊ शिकतच आहोत. कंटेंटला मरण नाही, पण प्रोसेस ही चालूच राहणार. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात काय होईल काय सांगता येत नाही.
६. तुझं नेमकं काम काय असतं?
मला माझ्या कुटुंबात पण विचारतात मी नेमकं काम काय करते? मालिका सुरु असल्यावर कुठेतरी नाव दिसत माझं. तेव्हा मी त्यांना सांगते की, मी डेलीसोप बनवते. त्यामागे प्रोसेस मोठी असते. १०० लोकांची टीम त्यासाठी काम करत असते. एका मुलीची गोष्ट दाखवायची तर ती मुलगी प्रेक्षकांना एक ऊर्जा देण्याचं काम करणार आहे. तर त्याला ट्रॅकवर आणण्याचं काम करते. प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायचंय आणि आता त्या गोष्टीची गरज आहे की नाही हे ठरवणं, नंतर ती गोष्ट घडत जाईल, त्यासाठी ही अभिनेत्री परफेक्ट आहे का, की नव्या कलाकाराची ऑडिशन करायचीय अशा गोष्टी ठरत असतात.
उदाहरण सांगायचं तर, 'तुझं माझं सपान' नावाची मालिका दीड वर्ष चालली. मालिकेत कुस्तीपटू मुलीचं एका कुस्तीपटू मुलाशी लग्न होतं. पण त्या मुलाने कुस्ती सोडली असते, अशी कथा होती. आम्ही ऑडिशन घेत होतो. तेव्हा खऱ्या कुस्तीपटूला घेण्याची कल्पना पुढे आली. पुढे आम्ही तिला अभिनयाचं प्रशिक्षण आम्ही देणार होतो. त्यामुळे तशी निवड केल्यावर त्या कॅरेक्टरला एक Raw नेस आला. आणखी एक उदाहरण सांगायचं तर, सुबोध भावेच्या नवीन मालिकेसाठी AI चा वापर केला होता. सुबोध भावेसारखा कलाकार घेतलाय तर आपण २५ वर्षांपुर्वीचे सुबोध भावे कसं दाखवणार. त्यावेळी आमचे बिझनेस हेड अजय भालवणकर यांनी कल्पना पुढे आणली. सोनीचं रिसर्च सेंटर आहे. तिथे AI वगैरे कसं डेव्हलप होतं, हे बघायला अजय भालवणकरांनी सांगितलं. नंतर ती ८ महिन्यांची प्रोसेस होती. पहिल्यांदा AI टेलिव्हिजनवर करण्याची संधी मिळाली.
७. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा लोकप्रिय शो आणण्यामागे काय विचार होता?
कुठल्याही भाषेमध्ये विनोदाचा वापर वेगळ्या पद्धतीने होतो. हिंदी आणि मराठीमध्ये ते वेगळ्या पद्धतीने स्विकारलं जातं. हास्यजत्राची खासियत ही आहे की, या शोची टीम म्हणजे सचिन गोस्वामी आणि सचिन मोटेंनी एक सीरिज काढली. नॉन फिक्शन शोमध्ये सीरिज काढणं खूप कमी होतं. हास्यजत्रेच्या माध्यमातून रोज एक नवीन गोष्ट आपण लोकांना सांगतोय. त्यामुळे लोकांशी हा शो जास्त जोडला गेला. उदा. लॉलीसारखी व्यक्तिरेखा. कोरोनाकाळात लोकांना एंटरटेन करायचं काम कॉमेडीच्या माध्यमातून होत होतं. त्या काळात आपण सर्व खचले होतो. त्यावेळी पण दमणला जाऊन सर्व कलाकार ज्या एनर्जीने सर्व करत होते त्याचं आम्हालाही खूप कौतुक आणि अप्रुप वाटलं. जेव्हा हे कलाकार देशात-परदेशात लाईव्ह शो करतात तेव्हाही चांगला प्रतिसाद मिळतो.
८. गौरव मोरे, ओंकार भोजने हे कलाकार हास्यजत्रेत परत दिसतील का?
शो मस्ट गो ऑन. जसं मालिकांमध्येही रिप्लेसमेंट होत असतात. कारणं वेगळी असतात. शोचा उद्देश आहे हसवण्याचा. त्यामुळे आम्ही हसवण्याचं काम करतोय. अमित फाळके हास्यजत्रा सुपरव्हाईस करतात. कंटेटंच्या दृष्टीने लोकांना वेगवेगळ्या व्यक्तिरेखा बघायला मिळत आहेत. आणखी कॅरेक्टर आणि आणखी काही कलाकार या फॅमिलीत समाविष्ट झालेत. आमचं कुटुंब वाढतंय. सचिन मोटे, सचिन गोस्वामींनी हास्यजत्रेच्या स्कीट्समध्ये फ्रेशनेस टिकवून ठेवलाय. तुम्ही काही रिपीट एपिसोड्स बघितले तरीही तुम्हाला तेवढंच हसू येतं.
९. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या मुलींना काय मार्गदर्शन करशील?
ठरवून काहीच होत नाही. आजकाल लहान मुलांमध्ये पुढे काय करायचंय याची claity दिसते. तुमच्यात जर ती clarity असेल त्याचा वापर करा. आणि त्या प्रामाणिकपणाने पुढे जात राहा. आजच्या पिढीमध्ये शिकण्याची आवड आहे. काम करण्याची पॅशन जपण्याकडे माझा कल असतो. मला अजूनही शिकायचंय. भिती वाटली तरी काय गंमत आहे हे मला explore करायला आवडतं. ज्यावेळी तुमचं शिकणं थांबतं, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला येतंय सर्व तेव्हा काहीतरी वेगळा मार्ग तुम्हाला निवडावा लागेल. कंटेट दर महिन्याला बदलतंय. आता लोक पुस्तक पण ऑडिओ बूकमध्ये वाचत आहेत. जास्तीतजास्त माहिती मिळवून आपण त्याचा कसा उपयोग करतोय हे महत्वाचं आहे. या क्षेत्रात ती गरज आहे. अलर्टपणा जपला पाहिजे. नवीन काय येतंय त्याची माहिती करुन घेतली पाहिजे. तुम्ही पॅशनेट राहा, गोष्टी सांगत राहा. सध्या असलेल्या टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घेऊन पुढे गेलं पाहिजे. chatgpt असलं तरीही तरी लिखाणातली भावनिकता आणू शकत नाही. ते लेखकच करु शकतो.