नीना कुलकर्णी या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. नीना कुलकर्णींना आपण विविध माध्यमांत आजवर अभिनय करताना पाहिलंय. नीना यांनी अभिनय केलेले विविध सिनेमे चांगलेच गाजले. 'उत्तरायण', 'गोदावरी', 'शास्त्री विरुद्ध शास्त्री' अशा विविध हिंदी - मराठी सिनेमांमध्ये नीना कुलकर्णींनी काम केलंय. नीना कुलकर्णी यांनी 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेत केलेली जिजाऊंची भूमिका चांगलीच गाजली. या भूमिकेविषयी नीना यांनी त्यांचं स्पष्ट मत सांगितलंय
जिजाऊंची भूमिका साकारताना आलेला अनुभव
'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेत जिजाऊंची भूमिका साकारल्यावर नीना कुलकर्णी कॅचअप चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, "२०२१ साली मला असं वाटतं जिजामाता संपलं. कारण मी शेवटचा टप्पा केला. त्यांच्या वयाची पन्नाशी ते पंच्याहत्तरी असा. माझ्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट रोल जो मिळाला तो म्हणजे जिजाऊसाहेबांचा. मी त्या ताकदीने केला की नाही माहित नाही."
नीना कुलकर्णी पुढे म्हणाल्या, "आऊसाहेबांचं आयुष्य जगण्याची संधी मिळणं ही फार मोठी गोष्ट होती होती. खूप पॉवरफूल रोल मला मिळाला होता. आऊसाहेबांची भूमिका केल्यावर मी दमले म्हणून नाही तर आता मला याच्यापुढे काय करायचंय असं झालं. मी overwhelmed झाले होते" अशाप्रकारे नीना कुलकर्णींनी त्यांना आलेला अनुभव मुलाखतीत सांगितला. नीना लवकरच स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत झळकणार आहेत.