Join us

'मला जगातला सगळ्यात गोड अन् गोंडस बाबा...'; 'फादर्स डे'निमित्त प्राजक्ता माळी व्यक्त झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 6:32 PM

प्राजक्ता माळी लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे.

आज जागतिक फादर्स डे आहे.  भारतात दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा 2024 मध्ये 16 जून रोजी साजरा केला जात आहे. हा दिवस म्हणजे मुलांसाठी त्यांच्या वडिलांबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी आहे. त्यानिमित्त अनेकजणांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

प्राजाक्ता माळीने आपल्या वडिलांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. 'फादर्स डे' निमित्ताने वडिलांसोबतचे खास क्षण प्राजाक्ताने शेअर केले आहेत. प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहलं, गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवशी बाबांची तब्येत बरी नव्हती. त्यांना चालताही येत नव्हतं. पण, तरीही त्यांनी "मैं हूं डॉन" हे गाणं मोठ्या उत्साहात गायलं. मला जगातले सगळ्यात गोड, गोंडस वडील मिळाले आहेत'.

पुढे प्राजक्ताने लिहलं, '10 वर्षांहून अधिक काळ मी मुंबईत राहतेय, ते अजूनही मला दिवसातून किमान दोनदा कॉल करतात आणि 'जेवलीस का?' ऐवढं विचारतात. मी खूप भाग्यवान आहे, आणि ते सुद्धा आहेत, ज्यांच्या सोबतीला मार्गदर्शन, संरक्षण, प्रेम आणि प्रोत्साहन देण्यासाठी वडील आहेत. आपले पालक हे देवाने पाठवलेले देवदूत आहेत. तुम्हा सर्वांना फादर्स डे च्या शुभेच्छा'. प्राजक्ताची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. चाहत्यांनी या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केलाय. 

 प्राजक्ता माळी लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावरून कलाविश्वात पदार्पण केलेल्या प्राजक्ताने अल्पावधीतच स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. 'जुळून येती रेशीमगाठी', 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. त्यासोबतच प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. ऐवढचं नाही तर प्राजक्ता ही एक  बिझनेसवुमनदेखील आहे.  प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच चाहत्यांसोबत आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असते. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटीमराठी अभिनेतासोशल मीडियाजागतिक पितृदिन