छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. सध्या सायली काय करते हे जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता आहे. ती काय करते, तिचा आगामी प्रोजेक्ट काय, सायली सिनेमा करणार की छोट्या पडद्यावर ती परतणार याची रसिकांना उत्सुकता होती.आता प्रतिक्षा संपली आहे कारण सायलीच्या फॅन्ससाठी एक गुडन्यूज आहे.सायली लवकरच ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांच्यासह मालिकेत झळकणार आहे.परफेक्ट पती या मालिकेत सायली राजस्थानी मुलगीच्या रूपात रसिकांच्या भेटीला येणार आहे.
राजस्थानच्या पार्श्वभूमीवर घडणारी परफेक्ट पती ही नवी मालिका एका तरुण आणि स्वतंत्र मुलीची कथा आहे. विधिता रजावतची भूमिकेत सायली झळकणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांना या मालिकेतील नायकाच्या आईची महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यासाठी घेण्यात आले. त्यानंतर निर्मात्यांनी नायिकेची भूमिका साकारण्यासाठी काहे दिया परदेसमधून प्रसिद्ध झालेली सायली संजीव हिची निवड केली आहे. मॉडेलिंगमधून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या सायलीने मराठी, तामिळ आणि बंगाली सिनेमातही कामं केली आणि आज ती मराठी मनोरंजन क्षेत्रातील तिने आपले वेगळे स्थान निर्माण केेले आहे.
आजवर प्रेक्षकांनी तिला अशा भूमिकेत पाहिलेलं नाही. आकर्षक, सकारात्मक आणि तिच्या गावातील सगळ्यात जास्त शिकलेली विधिता अनाथ आहे. तिची बहिण आणि भाऊजी यांनीच तिला लहानाचं मोठं केलंय.परफेक्ट पतीमध्ये सहभागी होण्याबद्दल सायली म्हणाली, "परफेक्ट पतीमध्ये विधिताची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी फारच भाग्याची गोष्ट आहे. ती आजच्या जगातील एक सुशिक्षित मुलगी आहे. मात्र, ती आपल्या परंपराही मनापासून मानते. शिवाय, राजस्थानी मुलीची भूमिका साकारण्यासही मी उत्सुक आहे. कारण, आजवर मी अशी भूमिका केलेली नाही. आयुष्याच्या वाटेवर ही व्यक्तिरेखा कशी बदलते, बहरते आणि अनेक कठीण प्रसंगातून आजचं तिचं व्यक्तिमत्त्व कसं उभं राहिलं, हे फार उत्कंठावर्धक आहे.
अशा लोकप्रिय आणि दमदार कलाकारांसोबत काम करणं ही अभिमानाची बाब आहे. जयाजी आणि सुनिताजी यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांकडून मी अभिनयाचे काही धडे नक्कीच घेऊ शकेन. परफेक्ट पती ही मालिका प्रेक्षकांना आपलीच कथा वाटेल आणि ही मालिका महिलांना स्वत:चे निर्णय घेण्यास प्रोत्साहन देईल. या मालिकेसोबत मी एक नवा प्रवास सुरू करतेय आणि मला प्रेक्षकांचे आशीर्वाद हवे आहेत. आजवर प्रेक्षकांनी मला जे प्रेम दिलंय, तसंच यापुढे कायम राहील, अशी मला आशा आहे."
लग्नाळू मुलगी आपल्या होणाऱ्या पतीमध्ये नेमके कोणते गुण पाहते, हे परफेक्ट पतीमध्ये मांडण्यात आलं आहे. इतकंच नाही, लग्नानंतर आपला नवरा आपल्याला वाटतो तसा नाही, हे लक्षात आल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी बायकोवर येऊन पडते, हे सुद्धा या मालिकेत दाखवण्यात आले आहे.