Join us

मराठी मालिका ते थेट बिग बींचं KBC, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास

By ऋचा वझे | Published: October 04, 2024 1:23 PM

अभिनेत्री शाल्मली टोळ्येची नवरात्रौत्सवानिमित्त विशेष मुलाखत. सेलिब्रिटी 'कॉस्च्युम स्टायलिस्ट' या क्षेत्राबद्दल सविस्तर माहिती नक्की वाचा.

नृत्यांगना, अभिनेत्री आणि आता वेषभूषाकार (Costume Stylist) अशा विविध भूमिका पार पाडणारी शाल्मली टोळ्ये. शाल्मलीचा मनोरंजनविश्वातील प्रवास खूप प्रेरणादायी आहे. अभिनयासोबत तिची वेशभूषाकार ही नव्याने ओळख कशी झाली, हे क्षेत्र नक्की कसं आहे आणि यात कोणते आव्हानं आहेत याविषयी नवरात्र स्पेशल नवदुर्गा या विशेष सदरात शाल्मलीने 'लोकमत फिल्मी'सोबत दिलखुलास संवाद साधला. 

>>ऋचा वझे 

१. तू अभिनेत्री म्हणून सर्वांनाच माहित आहेस. पण वेशभूषाकार म्हणून तुझी सुरुवात कशी झाली?

मी नृत्यांगना म्हणून करिअरला सुरुवात केली होती. ए आर रहमान, सोनू निगम यांच्या शोजमध्ये मी डान्स करायचे. तुम्ही कायम प्रेझेंटेबलच दिसलं पाहिजे हे मी तिथून शिकले. मी सुरुवातीला मुंबईत प्रार्थना बेहेरे आणि स्वप्नाली पाटीलसोबत राहायचे. आम्ही रुममेट्स होतो. तेव्हाही मी त्या दोघींना तयार होण्यात मदत करायचे. छान गोष्टी सुचवायचे. स्वप्नालीची आई आम्हाला नेहमी म्हणायची की फक्त अभिनय यावरच अवलंबून राहू नका. प्लॅन बी सुद्धा तयार ठेवा. हा खूप महत्वाचा सल्ला होता. तेव्हा मला वाटायचं की काहीतरी वेगळं केलं पाहिजे पण काय करायचं हे कळतच नव्हतं. एकदा गिरीजा ओकनेच मला याची जाणीव करुन दिली की तुझ्यात स्टायलिस्ट होणं हेच तर वेगळं टॅलेंट आहे. तू याचा प्रोफेशन म्हणून का विचार करत नाहीस? मग एकदा प्रार्थना आणि तिच्या नवऱ्याने मला त्यांच्या एका सिनेमासाठी वेशभूषाकार म्हणून काम करायला आवडेल का विचारलं. मीही तयार झाले आणि मला कळलं की हे मला आवडतंय. यानंतर मला एकानंतर एक कामं मिळत गेली. 'तुला पाहते रे' ही माझी वेशभूषाकार म्हणून पहिलीच मालिका. मालिकेत जो लग्नाचा भाग दाखवला आहे ते कॉस्च्युम सगळ्यांनाच खूप आवडले. त्याचं खूप कौतुक झालं होतं तेव्हा आनंद झाला आणि हा प्रवास सुरु झाला.

२. प्रोफेशन म्हणून हे क्षेत्र कसं आहे. काय प्रक्रिया असते?

हे क्षेत्र दिसतं तेवढं सोपं नाही. कलाकारांच्या भूमिकेला डोक्यात ठेवून कपडे स्टाईल केले जातात. कधीकधी लेखक स्क्रीप्टमध्ये लिहून देतात तर कधी क्रिएटर सांगतात तसं करावं लागतं. भूमिकेला शोभून दिसेल असे कपडे त्यांना देणं हा 'क्रिएटिव्ह थॉट' आपल्याकडे असावा लागतो. कधीकधी उद्याचा सीन आज कळतो. तेव्हा धावपळ होते. पण आजूबाजूचे लोकही छान सुचवतात. मात्र ऐनवेळी त्या त्या गोष्टी घेऊन येणं हा मोठा टास्क असतो. 

डेली सोप करताना खूप धावपळ होते. मी 'रंग माझा वेगळा'मध्ये अभिनयही केला आणि स्टायलिस्टही होते. तेव्हा मात्र माझा कस लागला. दोन्ही मॅनेज करणं बरेचदा कठीण होतं. तसंच काय स्टाईल करणार आहोत याचे आधी चॅनलला पर्याय दाखवावे लागतात. नंतर फायनल होतं. सगळं एकत्र आलं  की खूप ताण येतो. पण कामात तडजोड केलेली मला आवडत नाही. म्हणून मी परफेक्ट देण्याचाच प्रयत्न करते.

३. या क्षेत्रातही स्पर्धा आहे का? तू स्पर्धेत कशी  टिकून राहते?

स्पर्धा ही कोणत्याही क्षेत्रात असतेच. पण ती हेल्दी स्पर्धा असायला हवी. म्हणजे आम्ही एकमेकांवर जळत नाही. बरेचदा इतर कॉस्च्युम स्टायलिस्ट तुम्हाला मदतही करतात.तसंच दुसऱ्यांना खाली खेचून काही करायचं नाही हे आपले संस्कार आहेत. त्यामुळे स्पर्धा हेल्दी असेल तर चांगलंच वाटतं. 

४. कॉस्चुमवरुन अभिनेत्री अनेकदा नखरे दाखवतात. तू तर अभिनेत्री आणि स्टायलिस्टही आहेस. मग तुला याचा फायदा झाला का? की तुलाही अभिनेत्रींनी नखरे दाखवले?

खरं सांगायचं तर निवेदिता सराफ, हर्षदा खानविलकर या सीनिअर अभिनेत्रींचं खूप अप्रुप वाटतं. त्या समजून घेतात, पाठिंबा देतात. त्यांचं एवढंच म्हणणं असतं की मी जशी आहे तशी दिसू दे. तेच जर आताच्या पिढीतल्या अभिनेत्रींना पाहिलं तर त्या आपल्या स्टाईलबाबतीत थोड्या कॉन्शियस असतात. भूमिकेला काय हवंय याचा विचार न करता त्यांना वैयक्तिकरित्या काय हवंय हे त्यांच्या डोक्यात असतं. या उलट आम्हाला त्यांचा नाही तर त्या साकारत असलेल्या भूमिकेचा विचार करायचा असतो. अशा वेळी डील करायला जरा त्रास होतो. पण काही नवोदित अभिनेत्री खरंच खूप गुणी आहेत. त्यांना कॉस्च्युम, ज्वेलरी यांची काळजी घेता येते. तर काही अगदीच वेंधळ्यासारखे कॅरी करतात तेव्हा राग येतो.

५. अनेकदा कलाकार मानधन वेळेत मिळालं नाही म्हणून आवाज उठवतात. हे क्षेत्रही त्याच Industry चा भाग आहे. तुलाही असा अनुभव आलाय का?

काही प्रोडक्शन कंपन्या याबाबतीत अगदी चोख आहेत. वेळच्या वेळी तुम्हाला पैसे मिळतात. पण काही कंपन्यांबाबतीत हा अनुभव येतो. बरेचदा स्टायलिस्ट म्हणून काम करताना काही गोष्टी विकत घ्यायला आधी खिशातले पैसे  जातात. मग नंतर Reimbursement मिळायला वेळ लागतो. पैसे मिळतात पण वेळ लागतो. 

६. 'अभिनय' की 'स्टायलिस्ट' काय जास्त एन्जॉय करतेस?

अभिनय हे माझं प्रेमच आहे. पण कधी कधी अभिनयात तोचतोचपणा यायला लागला आहे. पण मग स्टायलिस्ट म्हणून काम करताना मला खूप मजा येते. डोक्याला चालना मिळते. सतत वेगवेगळं काहीतरी करता येतं. डेली सोपमध्ये लग्न लावताना तर मला खूपच मजा येते. अगदी खऱ्याखुऱ्या लग्नाप्रमाणेच सगळी तयारी असते. तेव्हा त्यांचे कॉस्च्युम स्टाईल करताना धमाल येते. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मी हा अनुभव घेतला. तसंच अमिताभ बच्चन यांच्या केबीसी मध्ये मी लहान मुलांच्या सेगमेंटमध्ये त्यांचे कपडे डिझाईन केले. तोही कमाल अनुभव होता.

७.  कामाच्या ठिकाणी 'स्त्री' आहे म्हणून कधी वेगळा अनुभव आलाय का?

सुदैवाने नाही. मला सगळीकडे समान वागणूक मिळाली. पण एका शोमध्ये जिथे ५ पुरुष क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत तिथे ते कामात चुका काढायचे. माझं म्हणणं फक्त इतकंच असायचं की पटेल असं कारण द्या. आमच्यावरही विश्वास ठेवा. आम्हीही करु शकतो. 

८. बरेचदा अभिनेत्रींना कपड्यांवरुन ट्रोल केलं जातं. तुलाही ट्रोलिंगचा अनुभव आला आहे का? तसंच अभिनेत्री तुझ्या सांगण्यावरुन बोल्ड कपडे घालतात का?

ट्रोलिंगला मी सकारात्मक पद्धतीनेच घेते. मध्यंतरी एक पेज होतं ज्यात सगळेच खूप ट्रोल होत होते. माझंही त्यात काम ट्रोल झालं होतं. पण कधीकधी त्यांनी सांगितल्या चुकाही बरोबर असतात. आमच्याकडून तशी चूक घडलेली असते. पण त्यांची सांगण्याची पद्धत वाईट असते. आणि बोल्ड कपड्यांबाबत सांगायचं तर त्याला सरसकट अंगप्रदर्शन असं म्हणलं जातं. पण ते तसं नसतं. अनेक अभिनेत्री असे कपडेही खूप छान कॅरी करतात. तसंच मी त्या सेलिब्रिटीचा कम्फर्ट पाहूनच त्यांना स्टाईल करते.

९. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्य यात कसा समतोल राखतेस?

मी सध्या काम एके काम करत आहे. स्वत:ला कामात झोकून दिलं आहे. वैयक्तिक आणि प्रोफेशनल असं दोन्ही मी व्यवस्थित विभागलं आहे. आईवडिलांचाही मला पाठिंबा मिळतो. त्यांना माहित असतं मी कामात असताना अजिबात बोलणार नाही. त्यामुळे तेही समजून घेतात.

टॅग्स :सेलिब्रिटीमराठी अभिनेताशारदीय नवरात्रोत्सव २०२४टेलिव्हिजन