'शरारत' या गाजलेल्या मालिकेमुळे अभिनेत्री श्रुती सेठ (Shruti Seth) सर्वांची लाडकी बनली. श्रुतीने आमिर खान-काजोलच्या 'फना' सिनेमातही छोटी भूमिका साकारली होती. याशिवाय तिने काही सिनेमे केले. मात्र काही काळापासून श्रुती सेठ फारशी कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसत नाही. काही दिवसांपूर्वी आलेल्या 'जिंदगीनामा' ही या सीरिजमध्ये ती दिसली. नुकतंच तिने एका मुलाखतीत महिलांच्या सुरक्षेवर भाष्य केलं. लोकल ट्रेनमध्ये तिच्यासोबत छेडछाड झाली होती.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत श्रुती सेठ म्हणाली, "एकाच प्रकारचं काम करुन मला मजा येत नाही. मी चांगल्या भूमिकांच्या शोधात असते. काही वर्षात टीव्ही आणि वेबमध्ये बराच बदल झाला आहे. त्यामुळे येत्या वर्षात तुम्ही मला इंटरेस्टिंग भूमिकांमध्ये पाहाल अशी मला आशा आहे."
महिलांच्या सुरक्षेवर श्रुती म्हणाली, "महिलांना स्वत:च्याच सुरक्षेची सतत भीती वाटते. देशात एक पुरुष रात्री कितीही वाजता काहीही कपडे घालून बाहेर पडू शकतो. पण एक महिला तसं करु शकत नाही. आजकाल अगदी बसमध्येही मुलींचा विनयभंग होतो. भरदिवसाही काहीही कृत्य घडतं. माझ्यासोबत आजपर्यंत जी काही छेडछाड झाली आहे सर्व पुरुषांनीच केली आहे. सगळे पुरुष एकसारखेच असं मी म्हणणार नाही पण मी कधीच असं ऐकलं नाही की कोण्या महिलेने पुरुषावर बलात्कार केला असेल. किंवा महिलेने महिलेसोबतच वाईट कृत्य केलं असेल असं काहीच आपण ऐकलेलं नाही. त्यामुळे आपण पुरुषांनाच प्रश्न विचारणार ना? यात चूक काय आहे? आता मी सोशल मीडियावर हे सगळं बोलत नाही तर तिथेच बोलते जिथे माझं ऐकलं जाईल. ना की मला शिव्या दिल्या जातील."
श्रुती सेठने दिग्दर्शक दानिश असलमसोबत लग्न केलं आहे. तिला एक मुलगीही आहे. श्रुतीच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी चाहत्यांना उत्सुकता आहे.