बरेचसे मराठी कलाकार हे हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपली छाप उमटवताना दिसतात. मात्र आपल्या मातृभाषेत सुद्धा या कलाकारांची काम करण्याची मनापासून इच्छा असते, मात्र तशी संधी मिळत नसल्यामुळे त्यांचे काम असून राहते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे शुभांगी लाटकर (Shubhangi Latkar). त्या तब्बल ८ वर्षानंतर मराठी मालिकासृष्टीकडे वळत आहेत. स्टार प्रवाहवरील लवकरच सुरू होत असलेल्या मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतून शुभांगी लाटकर बऱ्याच प्रतीक्षेनंतर कमबॅक करत आहेत. मालिकेत नायकाच्या आईची भूमिका साकारत आहेत.
शुभांगी लाटकर गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीत कार्यरत होत्या. नाट्य स्पर्धा, एकांकिकेमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिक पटकावली होती. २०१० साली गंगा की धीजमधून त्यांनी हिंदी मालिका विश्वात पदार्पण केले होते. नंतर टीव्ही नाटक दो दिल बंधे एक डोरी से मध्ये लताची भूमिका केली. या भूमिकेसाठी फेव्हरेट सासु म्हणून झी रिश्ते पुरस्कार पटकावला होता. इश्क का रंग सफेद, पुकार, संयुक्त, बारिश अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. शुभांगी लाटकर यांचा जन्म १३ मे १९७२ रोजी मुंबई येथे झाला. त्या पूर्वाश्रमीच्या शुभांगी फावडे म्हणून नाटकातून काम करत असत. त्यांचे लग्न सुप्रसिद्ध पत्रकार आणि सकाळचे संपादक संजीव लाटकर यांच्याशी झाले आहे. त्यांना असीम आणि यशोदा ही दोन अपत्ये आहेत. मन धागा धागा जोडते नवा मालिकेतून पुनरागमन होत असल्याने आपल्या भूमिकेबाबत खूपच उत्सुक आहेत.