हा ऑगस्ट महिना मराठी प्रेक्षकांसाठी खास मेजवाणी घेऊन आला. या महिन्यात एक दोन नाहीत तर 7 नव्या को-या मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ती परत आलीये आणि वैदेही या दोन मालिका सुरू झाल्या आहेत, अन्य मालिकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. यापैकीच एक म्हणजे, ‘मन झालं बाजिंद’ ( ManJhalaBajind) ही मालिका. एक नवीकोरी प्रेमकहाणी घेऊन येत्या 23 ऑगस्टपासून ही मालिका आपल्या भेटीस येतेय. श्वेता राजन (Shweta Rajan)आणि वैभव चव्हाण हे दोन नवे चेहरे या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. आता या मालिकेची कथा काय असणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर यात कृष्णा या आईवडिलांविना वाढलेल्या एका महत्त्वाकांक्षी तरूणीची कथा तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
कृष्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता राजन हिने मालिकेचे ढोबळ कथानक सांगितली आहे. कृष्णालाआई-वडील नसतात. तिचे मामा आणि मामा कृष्णाला लहानाचं मोठं करतात. तिला अगदी फुलासारखं जपत असतात. अगदी कृष्णावरचं प्रेम कमी होऊ नये, म्हणून मामा-मामी स्वत:ला मूल होऊन देत नाहीत. कृष्णाच्या डोळ्यातलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते धडपडत असतात. कृष्णाला सीए बनायचं असतं आणि खूप मोठं होऊन मामा-मामींना मदत करायची असते. याच हुशार, संयमी, विचारी कृष्णाच्या आयुष्यात राया येतो. राया आणि कृष्णा यांच्या बेभान, बेधुंद प्रेमाची गोष्ट हळदीचा कारखाना, फुललेली शेती अशा गावाकडील पार्श्वभूमीवर खुलणार आहे.पिवळा रंग हे बुद्धीचं प्रतीक. हा मांगल्याचा, समृद्धीचा रंग आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला मान असतो. आत्मविश्वासनिर्माण करणारा हा रंग आपलं मनसुद्धा पवित्र करतो. या पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार आहे.
कृष्णाची भूमिका साकारणा-या श्वेता राजनला तुम्ही ओळखत असालच. ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील अज्या अर्थात नितीश चव्हाणसोबतच्या डान्स व्हिडीओत ती नेहमीच दिसते. नितीश सोशल मीडियावरच्या अनेक व्हिडीओत एका तरूणीसोबत कपल डान्स करताना दिसतोय. हीच ती श्वेता राजन खरात. ‘राजा राणीची गं जोडी’या मालिकेत संजीवनीची बेस्ट फ्रेण्ड अर्थात मोनाच्या रूपातही तुम्ही तिला पाहिलं असेल. हिचं श्वेता राजन खरात आता ‘मन झालं बाजिंद’ या नव्या को-या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.