Join us

वैजूच्या भूमिकेसाठी अभिनेत्री स्मिता पाटील ऋतुजा बागवेच्या प्रेरणास्थानी, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 6:28 PM

ऋतुजा बागवे (Rutuja Bagawe)ची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर' (Mati Se Bandhi Dor) नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत ऋतुजा मुख्य भूमिकेत आहे.

स्टार प्लस वाहिनीवरील 'माटी से बंधी डोर' (Mati Se Bandhi Dor) या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे (Rutuja Bagawe) आणि अंकित गुप्ता (Ankit Gupta) मुख्य भूमिका निभावत आहेत. ऋतुजा बागवे ही वैजयंती (वैजू) ही भूमिका साकारत असून अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत आहे. या मालिकेत वैजूच्या भावनिक उलथापालथीचे चित्रण करण्यात आले आहे, जी तिच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी संघर्ष करतेय. रणविजयशी भेट झाल्यानंतर तिच्या आयुष्यात घडणारे बदलही या मालिकेतून बघता येतील.  

ऋतुजा बागवेने वैजूची भूमिका साकारली आहे. वैजू ही एक खंबीर, स्वतंत्र स्त्री आहे, जी निर्भयतेचे मूर्त रूप आहे आणि प्रख्यात अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याप्रमाणेच, स्वप्ने पूर्ण करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या सर्व महिलांकरता एक प्रेरणादायी उदाहरण आहे. वैजू आणि स्मिता पाटील यांच्यात आणखी एक साम्यस्थळ आहे, ते म्हणजे या दोघीही मराठमोळ्या आहेत आणि शक्ती व अभिमान यांचे चित्रण करणाऱ्या आहेत. स्मिता पाटील यांनी बाजार, मिर्च मसाला, अर्थ आणि अशा कितीतरी उल्लेखनीय चित्रपटांतून स्त्री सक्षमीकरणाच्या भूमिका केल्या आहेत, तर ऋतुजा बागवे हिने नांदा सौख्य भरे आणि चंद्र आहे साक्षीला या भूमिकांकरता प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. आश्चर्य वाटेल इतका सारखेपणा स्मिता पाटील आणि वैजू यांच्यात आहे. प्रेक्षकांकरता वैजूला बघणे हे आनंददायी असेल, कारण ती आपल्याला भूतकाळात घेऊन जाते आणि स्मिता पाटील यांची आठवण करून देते.

ऋतुजा बागवे म्हणाली, माटी से बंधी डोर या मालिकेत, मी वैजूची व्यक्तिरेखा साकारत आहे, जी खंबीर आहे, स्वतंत्र आहे आणि निडर आहे. वैजू ही व्यक्तिरेखा साकारताना माझ्यासमोर दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आदर्श आहे. त्यांचा वेगळा लूक आणि ज्या साधेपणाने, अभिजाततेने त्या भूमिका साकारायच्या, त्यातून बरेच काही शिकत मी वैजूचे पात्र साकारत आहे. स्मिता पाटील या चित्तवेधक, निर्भय, सहजसुंदर आणि समतोल व्यक्तिमत्त्वाच्या जणू प्रतीक आहेत. त्या माझ्याकरता खरोखरीच प्रेरणास्थानी आहेत आणि माझ्या वैजू या व्यक्तिरेखेद्वारे, प्रेक्षकांना या वैजूत स्मिता पाटीलची झलक दिसावी आणि वैजू ही इतरांकरता प्रेरणा ठरावी असे मला वाटते.

टॅग्स :ऋतुजा बागवे