Join us

'मुरांबा' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट? मालिका सोडून एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:59 IST

अभिनेत्रीला ९ वर्षांचा मुलगा आहे. मालिका सोडून ती आता फुल टाईम कंटेंट क्रिएटर झाली आहे.

'मुरांबा' या स्टार प्रवाहवरील मालिकेत जान्हवी च्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री स्मिता शेवाळे (Smita Shewale). या भूमिकेमध्ये तिला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली. मात्र काही महिन्यांपूर्वीच तिने ही मालिका सोडली. स्मिताने मालिका सोडल्याने चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र नंतर तिने युट्यूब व्लॉगमध्ये मालिका सोडण्याचं कारण सांगितलं. लेकाचा सांभाळ करण्यासाठी ती पुण्याला शिफ्ट झाली आहे. लेकाला शूटिंगसाठी पुणे मुंबई सतत प्रवास नको म्हणून तिने मालिकेला रामराम केला. दरम्यान स्मिता नुकतीच एका मुलाखतीत सिंगल पॅरेंटिंग आणि दुसऱ्या लग्नाबद्दलही बोलली.

स्मिता शेवाळेने काही दिवसांपूर्वी 'रेडिओ सिटी मराठी'ला मुलाखत दिली. यात तिने सिंगल मदर असल्याचा खुलासा केला. ती म्हणाली, "माझ्या आयुष्यात वेगळा ट्विस्ट आला आहे. माझा मुलगा कबीर ९ वर्षांचा आहे. मी एकटीच त्याचा सांभाळ करत आहे. अशा वेळेला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ठराविक काळापर्यंत दोन्ही पालकांपैकी एकाने आपल्या मुलाजवळ असणं खूप गरजेचं असतं. जोपर्यंत ते परिपक्व होत नाहीत, त्यांचे विचार स्ट्राँग होत नाहीत तोवर त्यांच्या बरोबर असायला पाहिजे. मालिका करत असताना शिफ्ट १२-१२ तासांच्या होत्या. मी १४ तास बाहेर असताना कबीर काय करतोय हे मला फक्त सीसीटीव्हीतून कळायचं. त्याला काय आवडतं, शाळेत काय झालं, त्याला कशावर गप्पा मारायच्या आहेत हे सगळं मला जाणून घ्यायची उत्सुकता होती आणि ही मला गरजही वाटली. आई म्हणून मन मारण्यात अर्थ नाही असं मला वाटलं. त्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं असतं."

ती पुढे म्हणाली, "म्हणून या बरोबरीने मी दुसरं काय काम करु शकेन हा विचार मी सतत करत होते. हे डोक्यात ठेवून मी फुल टाईम कंटेंट क्रिएटर झाले. मला छान प्रतिसाद मिळतोय आणि मलाही हे खूप आवडतंय. त्यामुळे काही वर्षांसाठी फक्त मालिका करायच्या नाही असं मी ठरवलं आहे. चांगल्या फिल्म्स आपल्याकडे आहेत त्या करायच्या. कंटेंटचं काम प्रामाणिकपणे करायचं."

दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही का? यावर स्मिता म्हणाली, "आम्ही वेगळे झालो असलो तरी माझा मुलगा त्याच्या वडिलांच्या संपर्कात आहे. त्याच्या वडिलांनाही त्याच्याबद्दल प्रेम वाटतं. त्यांचा बाँड खूप छान आहे. आम्ही दोघं एकत्र का नाही असं कबीरने आम्हाला विचारलंच नाही. मुलांना वाईट बाजू नाही तर चांगलीच बाजू दाखवावी असं मला वाटतं. नवरा बायकोचं नातं हे वाईटच असतं असं मी कधीच त्याला सांगत नाही. दुसऱ्या लग्नाचा विचार करावा असं वाटतं. पण ते तितकं सोपं नसतं. या क्षेत्रात आहे म्हणून का काय मला माहित नाही पण ते मला खूप कठीण गेलं. माझी इच्छा होती पण तशी व्यक्तीच मला मिळाली नाही. दुसरं म्हणजे मी आता अशी स्वतंत्र झाली आहे ते आता डिस्टर्ब होऊ नये. जे होईल ते यापेक्षा चांगलं व्हायला पाहिजे. कारण यात मी फक्त माझाच विचार करु शकत नाही. कारण मी आई आहे मला कबीरचा विचार करायचा आहे हे स्पष्ट आहे."

स्मिताने २०१३ रोजी निर्माता राहुल ओडकशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर १२ वर्षांनी ते वेगळे झाले आहेत. स्मिता नुकतीच 'सुभेदार' या मराठी सिनेमात दिसली होती. सध्या ती कंटेंट क्रिएटर म्हणून समोर येत आहे. शिवाय ती सिनेमांमधूनही भेटीला येत राहणार आहे.

टॅग्स :मराठी अभिनेताघटस्फोटलग्नसोशल मीडियाटिव्ही कलाकार