Join us

Spruha Joshi : 'अशी भीती मला होती..', स्पृहा जोशीची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 17:10 IST

अभिनेत्री स्पृहा जोशीची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच. दमदार अभिनयाच्या जोरावर स्पृहाने मनोरंजन सृष्टीत एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.

मराठी अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका आणि युट्युबर अशा अनेक भूमिकांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (Spruha Joshi ). तिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच. दमदार अभिनयाच्या जोरावर स्पृहाने मनोरंजन सृष्टीत एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. अर्थात दीर्घकाळापासून स्पृहा कोणत्याही मालिकेत झळकलेली नाही. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपलीये. स्पृहा झी मराठीवरील ‘लोकमान्य’ मालिकेत टिळकांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसतोय. दरम्यान सोशल मीडियावर तिची एक पोस्ट चर्चेत आली आहे.  

तिने तिचे ‘लहानपण देगा देवा’ या नाटकादरम्यानचे काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करताना तिने लिहिलं, “अनुभवाने तुमची निवड बदलू शकते….अभिनेत्री होणं हे माझं कधीही स्वप्न नव्हतं. अभिनयाकडे मी फक्त छंद म्हणून बघायचे. यात करिअर करण्याचा माझा कधीही विचार नव्हता. ‘अग्निहोत्र’ मालिकेत काम करत असताना मी दोनहून अधिक काळ यूपीएससी परिक्षेची तयारी करत होते.”

“अभिनेत्री होण्यासाठीचे गुण माझ्यात नाहीत अशी भीती मला होती. त्यामुळे अभिनयाकडे करिअर म्हणून बघताना मी साशंक होते. पण त्यानंतर मला थिएटर करण्याची आणि सुनील दादांच्या (सुनील बर्वे) प्रॉडक्शनमध्ये मंगेश कदम यांच्या दिग्दर्शनाखाली शरद पोंक्षे आणि अनेक दिग्गज कलाकारांसोबत 'लहानपण देगा देवा' या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. हे माझे पहिले व्यावसायिक नाटक होते आणि जेव्हा मला कळलं की मला यापेक्षा जास्त आनंद कशातच मिळत नाही आणि तेव्हाच मी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 

स्पृहाने यापूर्वी 'उंच माझा झोका' या ऐतिहासिक मालिकेत काम केले होते. यात तिने रमाबाई रानडे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. आता पुन्हा एकदा स्पृहाला ऐतिहासिक मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत 

टॅग्स :स्पृहा जोशीझी मराठी