मेरी जावेद आणि बेपनाह अशा मालिकेत काम करणारी, ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत असते ती तिच्या तोकड्या कपड्यांमुळे. होय, उर्फी तोकडे कपडे घालून मिरवते आणि तिच्या कामापेक्षा तिच्या या बोल्ड, अतरंगी कपड्यांचीच चर्चा होते. यावरून ती सतत ट्रोल होते. पण ट्रोलर्स पर्वा करेल ती उर्फी कुठली? कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना उर्फी सणसणीत उत्तर देते.आता तिने भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनाही तसंच कडक उत्तर दिलं आहे.
नुकतंच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा एक व्हिडीओ शेअर करत ट्वीट करत त्यावर आक्षेप नोंदवला होता. ‘शी…ऽऽऽऽ अरे हे काय चाललंय मुंबईत? रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला, मुली विकृतांच्या शिकार होतायत तर ही बया अजून विकृती पसरवतीये...,’असं त्यांनी लिहिलं होतं.त्यांच्या या ट्वीटला आता उर्फीनं उत्तर दिलं आहे.
काय म्हणाली उर्फी?‘आज राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला लक्ष्य करत आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणं, सोयीचं आहे. नेहमीच पीडितेच्या कपड्यांना दोष दिला जातो अनेक मूद्दे आहेत. जसं बेरोजगारी, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणं, खून. या प्रकरणांचे काय?’, असं उर्फीने चित्रा वाघ यांना दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.
दुसऱ्या रिप्लायमध्ये उर्फी म्हणतेय, ’तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. तुम्हाला माझ्याबद्दल बोलून जनतेचं लक्ष वेगळ्या विषयाकडे वळवायचे आहे. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही का करत नाही? महिलांचे शिक्षण, प्रलंबित असलेली बलात्काराची प्रकरणे, याकडे तुम्ही लक्ष का देत नाही?,’
कोण आहे उर्फी?
‘बिग बॉस ओटीटी’ आधी उर्फी जावेद हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. तिची लोकप्रियता किती? तर आता उर्फी Most Searched Asian 2022 यादीत आली आहे. ना मालिका, ना मोठे शो, ना चित्रपट... काहीही नसताना उर्फीने केवळ अतरंगी फॅशनच्या जोरावर जगभरातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या व्यक्तीच्या यादीत स्थान मिळवलं आहे.