विशाखा सुभेदार या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. विशाखा गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. विशाखा यांनी मनोरंजन विश्वात विविध भूमिका साकारल्या. विशाखा या प्रसिद्ध होत्याच पण त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये विशाखा आणि समीर यांची जोडी प्रचंड गाजली. परंतु काही महिन्यांपुर्वी विशाखा यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला रामराम ठोकला. आज पुन्हा एकदा खास निमित्ताने विशाखा यांनी हास्यजत्रा सोडल्याविषयी मौन सोडलंय.
विशाखा यांना हास्यजत्रेचे लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी-सचिन मोटे यांच्या हस्ते पुरस्कार राम नगरकर पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने विशाखा यांनी एक खास पोस्ट लिहिलीय. विशाखा लिहितात, "राम नगरकर पुरस्कार सोहळा...2024 हा पुरस्कार ह्या माझ्या गुरु स्थानी असलेल्या दोन सचिन मास्तर ह्यांच्याकडून मिळाला हे ही माझं भाग्य.हा पुरस्कार देण्याचे ज्यांनी ठरवलं ते वंदन नगरकर हे हयात नाही ह्याचे मात्र वाईट वाटले."
विशाखा पुढे लिहितात, "फु बाई फु ते हास्यजत्रा.. विनोदी प्रहसन सादर करीत आले, त्याची शाबासकी मिळाली. पुरस्कार म्हटलं कीं जबाबदारी आलीच.. जरी हास्यजत्रा तुन बाहेर पडले ह्याचा अर्थ असा नाही होत की विनोदी अभिनय करण सोडलं.. एक ब्रेक घेतला होता पुन्हा एखाद्या विनोदी भूमिकेत दिसेनच... रसिकांचे आणि नगरकर कुटुंबियांचे खुप आभार.."