सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे काहीच दिवस बाकी असल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. संपूर्ण राज्यभरात राजकीय पक्षांच्या प्रचार रॅली निघत आहेत. अनेकदा राजकीय पक्षांच्या प्रचार रॅलीत सेलिब्रिटीही हजेरी लावताना दिसतात. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकरहीशिवसेना(उद्धव ठाकरे गट) प्रचार रॅलीत दिसले.
शिवसेना(उद्धव ठाकरे गट)कडून विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे जोरदार प्रचार करताना दिसत आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या प्रचाराची रॅली काढण्यात आली होती. या प्रचार रॅलीत आदेश बांदेकरही दिसले. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्याबरोबर आदेश बांदेकरही प्रचार करताना दिसले. याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रचार रॅलीत तेजस ठाकरेंसह आशिर्वादाचे क्षण…. निशाणी मशाल", असं कॅप्शन आदेश बांदेकर यांनी या व्हिडिओला दिलं आहे.
आदेश बांदेकर हे राजकारणात सक्रिय आहेत. २००९ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याचवर्षी त्यांनी माहीम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. पण, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आदित्य ठाकरेंबरोबरच शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेल्या इतर सदस्यांचा प्रचारही आदेश बांदेकर करताना दिसत आहेत.
दरम्यान, आदित्य ठाकरेंविरोधात वरळी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मनसेच्या संदीप देशपांडेचंही तगडं आव्हान असणार आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.