Join us  

दुःखद बातमी, ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचं निधन; वयाच्या ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:36 AM

अलिकडेच त्यांनी प्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटात माता शबरीची भूमिका साकारली होती.

Asha Sharma Death : ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा (Asha Sharma) यांचे निधन झाले.  वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. या बातमीनंतर आशा शर्मा यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. त्यांच्या निधनावर टीव्ही जगतासोबतच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीही शोक व्यक्त जातोय. आजारपणाशी झुंज देत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानं मनोरंजनसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे.

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (CINTAA)  आशा शर्मा यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. आशा शर्मा यांच्यावर गेल्या एक वर्षांपासून उपचार सुरू असल्याचे सांगितले जातंय. अभिनेत्री टीना घई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'आदिपुरुष सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आशा शर्मा चार वेळा पडल्या होत्या. त्यामुळे गेल्या एप्रिलपासून त्या पूर्णपणे अंथरुणाला खिळूनच होत्या. पण तरीही शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची त्यांची इच्छा होती आणि त्यांच्यामध्ये तो उत्साह होता'.

आशा शर्मा यांनी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये आई आणि आजीची भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आशा शर्मा यांनी टीव्ही मालिका 'कुमकुम भाग्य'मध्येही काम केले. शिवाय, आशा यांनी 'मन की आवाज प्रतिज्ञा', 'मीत मिला दे रब्बा', 'नुक्कड' आणि 'बुनियाद' सारख्या मालिकांमध्येही काम केलं. 

अलिकडेच त्यांनी प्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटात माता शबरीची भूमिका साकारली होती. 'आदिपुरुष'चे दिग्दर्शक ओम राऊत यांनी ईटाइम्सशी बोलताना दु:ख व्यक्त केलं. 'हे अत्यंत दुर्दैवी घडले. त्या एक विलक्षण अभिनेत्री आणि व्यक्ती होत्या. हे ऐकून खूप वाईट वाटतंय', असे ते म्हणाले. आशा यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यासोबत 'दो दिशां' या चित्रपटातही काम केले होते. 'हम तुम्हारे हैं सनम', 'मुझे कुछ कहना है', 'हमको तुमसे प्यार है' आणि '1920' सारख्या चित्रपटांमध्येही त्या झळकल्या होत्या. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनप्रभास