‘इमली’ (Imlie) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय हिंदी मालिका. स्टार प्लसवरच्या या हिंदी मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली़ इतकी की टीआरपी चार्टमध्ये कायम ही मालिका टॉप 5 मध्ये असते. आता याच मालिकेबद्दल एक खास बातमी आहे. होय, गश्मीर महाजनीने (Gashmeer Mahajani) ही मालिका सोडली आहे. गश्मीर या मालिकेत आदित्य कुमार त्रिपाठीची भूमिका साकारत होता. पण आता त्याने या मालिकेला रामराम ठोकला आहे. त्याने आपल्या शेवटच्या एपिसोडचं शूटींग पूर्ण केलं आहे. इमली अर्थात सुमबुल तौकीर खान हिने स्वत: इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. तिने खास अंदाजात गश्मीरला निरोप दिला आहे.
सुमबुलने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने गश्मीरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘हे फोटो योग्य क्रमात आहेत. तसा नेहमीसाठी निरोप नाही. भविष्यात आम्ही अनेक एकत्र प्रोजेक्टमध्ये काम करू. इंशाअल्लाह... तुला लवकरच भेटेन मित्रा...’, असं तिने तिच्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
का सोडली मालिका?गश्मीरने रागात ‘इमली’ ही मालिका सोडल्याची चर्चा आहे. काहींच्या मते, त्याने नव्या प्रोजेक्टमुळे मालिका सोडली तर काहींच्या मते, प्रॉडक्शन हाऊससोबतच्या मतभेदांमुळे त्याने या मालिकेचा निरोप घेतला. मात्र एका मुलाखतीत, या सगळ्या अफवा असल्याचं गश्मीरने म्हटलं आहे. ‘मालिका सोडण्याचं कारण निर्माता गुल खान आणि माझ्यामध्ये आहे. ते कायम आमच्यामध्येच राहील,’ असं त्याने स्पष्ट केलं आहे. मतभेद वा नव्या प्रोजेक्टमुळे मालिका सोडल्या या निव्वळ अफवा असल्याचेही त्याने स्पष्ट केलं आहे.
टीआरपीवर होणार परिणाम?गश्मीरने मालिका सोडल्यामुळे चाहते नाराज आहेत. गश्मीर या शोचा महत्त्वपूर्ण भाग होता. इमली, मालिनी व आदित्य या तिघांभोवती फिरणारं मालिकेचं कथानक प्रेक्षकांना प्रचंड भावलं होतं. यामुळे दर आठवड्याला ही मालिका टॉप 5 मध्ये स्थान मिळवतं होती. मात्र आता गश्मीरनं मालिका सोडल्यामुळे चाहते निराश आहेत. त्यामुळे टीआरपीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय. आता यात किती तथ्य आहे, हे लवकरचं कळेल. गश्मीरच्या जागी आता मानस्वी वशिष्ठ हा आदित्यची भूमिका साकारताना दिसणार आहे.