Join us

'काही वर्षांनी तुलाच वाटेल की..'; राहुलसोबत लग्न करण्यापूर्वी श्वेताला वडिलांनी दिला होता सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 16:47 IST

Shweta-Rahul Mehendale: श्वेता अन् राहुलमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला आवर्जुन एक सल्ला दिला होता.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे श्वेता मेहंदळे (shweta mehendale) आणि राहुल मेहंदळे (rahul mehendale). उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर या जोडीने आजवर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. नाटक, मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही जोडी खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार आहे. विशेष म्हणजे या दोघांची लव्हस्टोरी भन्नाट आहे. अलिकडेच या जोडीने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या वयातील अंतरावर भाष्य केलं.

श्वेता आणि राहुल या जोडीमध्ये जवळपास १२ वर्षांचं अंतर आहे. मात्र, आजही कोणत्याही मदभेदाशिवाय ही जोडी नेटाने संसार करत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वयात इतकं अंतर असतानाही त्यांच्या कुटुंबियांनी या लग्नाला होकार दिला होता. मात्र, होकार देण्यापूर्वी त्यांनी त्यांना एक सल्ला आवर्जुन दिला होता.

'तुमच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे तर या वयातील अंतरावर घरातल्यांचं काय मत होतं?' असा प्रश्न श्वेता आणि राहुल यांना विचारण्यात आला. त्यावर, "नाही आमच्या वयातील अंतरावरुन तसं घरातले काही म्हणाले नव्हते. मुळात तो जो प्रश्न निर्माण होतो तो जोडीदारांमध्ये परस्पर निर्माण होतो. की मी एवढ्या वयाचा आहे आणि ती एवढी लहान आहे वगैरे. पण, आमच्या दोघांना तसा काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे घरच्यांनाही प्रॉब्लेम नव्हता. त्यांचं मत होतं तुम्हाला या सगळ्याची जाणीव आहे ना मग ओके", असं राहूलने सांगितलं. 

त्याचीच री ओढत श्वेतानेही तिच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती हे सांगितलं. "माझे बाबा त्यावेळी मला म्हणाले की, तुला आता वाटेल फक्त १२ वर्ष. पण, काही वर्षांनी तुला वाटेल की बापरे १२ वर्ष म्हणजे खूप गॅप आहे आपल्यात. त्यामुळे याची जाणीव तुम्ही ठेवा. कारण, वय जसं वाढत जाईल तसं ते अंतर काही कमी होणार नाहीये हे बाबांनी सांगितलं होतं. पण, आम्हाला या सगळ्याची जाणीव होती आणि आम्ही ते एक्सेप्ट केलं होतं."

टॅग्स :श्वेता मेहंदळेसेलिब्रिटीटिव्ही कलाकारसिनेमा