'बिग बॉस १७' हा रिएलिटी शो अनेक कारणांमुळे चर्चेत होता. मराठमोळी अंकिता लोखंड 'बिग बॉस'मध्ये पती विकी जैनसह सहभागी झाली होती. विकीने पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'च्या घरात त्याचं स्थान पक्क करण्यास सुरुवात केली होती. 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी विकी एक होता. खेळातील डावपेच ते अंकिताबरोबर वाद यामुळे विकी चर्चेत आला होता. आता 'बिग बॉस'नंतर विकीला मोठ्या रिएलिटी शोची ऑफर मिळाली आहे.
विकीला 'बिग बॉस'मधून अर्ध्यातूनच बाहेर पडावं लागलं. त्यामुळे विकीचं 'बिग बॉस'च्या ट्रॉफीचं स्वप्न भंगलं. पण, असं असलं तरी विकीला पुन्हा एकदा 'बिग बॉस'ची ट्रॉफी मिळण्याची संधी मिळाली आहे. 'बिग बॉस' गाजवल्यानंतर विकीला 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वाची ऑफर मिळाली आहे. 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये जाण्यासाठी विकी उत्सुकही असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विकीने 'बिग बॉस ओटीटी ३'ची ऑफर स्विकारली असून या शोमध्ये तो एकटाच सहभागी होणार आहे.
'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या दोन पर्वांना लोकप्रियता मिळाली होती. ओटीटीचे दोन्ही सीझन हिट ठरले होते. दिव्या अग्रवाल 'बिग बॉस ओटीटी १' ची विजेती ठरली होती. तर युट्यूबर एल्विश यादवने 'बिग बॉस ओटीटी २'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. आता 'बिग बॉस ओटीटी ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण, या पर्वात सहभागी होत विकी जैनला पुन्हा एकदा 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी मिळू शकते.
दरम्यान, 'बिग बॉस १७'चा ग्रँड फिनाले रविवारी(२८ जानेवारी) पार पडला. कॉमेडियन मुनव्वर फारूकी यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला. तर अभिषेक कुमार पहिला रनर अप ठरला. मन्नारा चोप्राने टॉप ३मध्ये स्थान मिळवलं होतं. परंतु, अंकिताला मात्र चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.