अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची पुष्टी केली. पीटीआयशी बोलताना रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा सिद्धार्थ शुक्लाला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याचा मृत्यू आधीच झाला होता. सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. चाहते सोशल मीडियावर ट्विट करत श्रद्धांजली देत आहेत.
दरम्यान, सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांना पुन्हा सुशांत सिंग राजपूतची आठवण झाली. #SushantSinghRajput पुन्हा ट्विटरवर ट्रेंड होत आहे. सुशांत त्याच्या वांद्रे येथील घरी मृत अवस्थेत सापडला होता. त्याने आत्महत्या केली होती, अजूनही त्याच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. सुशांत सिंह राजपूतला पोस्टमॉर्टमसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तर दुसरीकडे सिद्धार्थलाही कूपर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयाने त्याला मृत घोषित केले.
चाहते सिद्धार्थ आणि सुशांत या दोघांच्या अनेक गोष्टींची तुलना करत आहेत. सोशल मीडियावर एकामागून एक ट्विट झपाट्याने व्हायरल होत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की दोघांनाही एकाच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, दोघेही खूप प्रतिभावान अभिनेते होते. दोघांनी टीव्हीपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत यशस्वी प्रवास केला होता. दोघांचे सोशल मीडियावर चांगले फॅन फॉलोइंग होते. दोघेही फिटनेसबाबत खूप जागरूक होते. जगाचा निरोप घेतला तेव्हा दोघेही त्यांच्या करिअरच्या शिखरावर होते.
टीव्ही जगतात सिद्धार्थ शुक्लाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते.अलीकडेच तो 'बिग बॉस ओटीटी'मध्ये शहनाज गिलसोबत झळकला होता. त्याने बिग बॉसचा १३ वा सीझन जिंकला होता. याशिवाय खतरों के खिलाडीचा सातवा सीझनही त्याने जिंकला होता. बालिका वधू या मालिकेतून सिद्धार्थने घराघरात आपली ओळख निर्माण केली होती.