इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. आता या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाच्या जोरदार तयारीला आता सुरुवात देखील झाली आहे. इंडियन आयडलच्या या नव्या सिझनमध्ये म्हणजेच इंडियन आयडल 11 मध्ये आपल्याला पुन्हा एकदा अनू मलिक या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. इंडियन आयडलच्या पहिल्या सिझनपासून अनू मलिक या कार्यक्रमाचा भाग होता. पण मी टू प्रकरणात त्याचे नाव आल्यानंतर त्याला हा कार्यक्रम सोडावा लागला होता. पण या सिझनमध्ये तो कमबॅक करणार असल्याचे वृत्त बॉलिवूड लाइफने दिले आहे.
इंडियन आयडलच्या गेल्या सिझनला खूपच चांगला टीआरपी मिळाला होता. हा सिझन आतापर्यंतच्या सगळ्या सिझनपैकी सगळ्यात जास्त पाहिला गेला होता. पण याच दरम्यान हा कार्यक्रम एका कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकला होता. गायिका श्वेता पंडितने अनूवर लैंगिक छळाचा आरोप केला होता आणि त्याचमुळे अनुला हा कार्यक्रम सोडावा लागला होता. त्यामुळे अनूच्या जागेवर कोणताही परीक्षक घेण्याऐवजी दर आठवड्याला आपल्याला एक वेगळी व्यक्ती परीक्षकाच्या खुर्चीत पाहायला मिळत होती. गेल्या सिझनमध्ये त्याची रिप्लेसमेंट आणण्यात आली नसल्याने आता या सिझनमध्ये अनूच परीक्षकाच्या खुर्चीत बसणार असल्याचे बॉलिवूडलाईफने म्हटले आहे. पण याबाबत त्यांनी अनू मलिकशी संपर्क साधला असता त्याने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
अनूने इंडियन आयडल 10 सोडल्यानंतर एक निवेदन मीडियाला दिले होते. त्यात त्याने म्हटले होते की, मी माझ्या कामावर सध्या लक्ष केंद्रित करू शकत नसल्याने मी या कार्यक्रमातून काही दिवसांसाठी ब्रेक घेत आहे. माझ्या या निर्णयाला वाहिनीतील मंडळीने देखील संमती दिली आहे.
इंडियन आयडल 10 मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत विशाल दादलानी आणि नेहा कक्कर यांना आपल्याला पाहायला मिळाले होते. आता इंडियन आयडल 11 मध्ये परीक्षकाच्या खुर्चीत कोण बसणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली असणार यात काहीच शंका नाही.