Bigg Boss 18 ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. यंदाच्या सीझनमध्ये सहभागी असलेले प्रत्येक स्पर्धक लोकांच्या मनावर त्यांची छाप पाडण्यात यशस्वी झाले आहेत. Bigg Boss 18 मध्ये यंदा एका गोष्टीमुळे खूप गदारोळ माजला. Bigg Boss 18 च्या टीमने घरात एका गाढवाला एन्ट्री दिल्याने या गोष्टीची घरात अन् घराबाहेर खूपच चर्चा झाली. यामुळे PETA ने Bigg Boss 18 चा होस्ट सलमान खान आणि संपूर्ण शोविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अखेर Bigg Boss 18 च्या टीमने गाढवासंबंधी मोठा निर्णय घेतला असून त्याला घराबाहेर काढण्यात आलंय.
Bigg Boss 18 च्या टीमचा गाढवाला घराबाहेर काढण्याचा निर्णय
People For Animals (PFA) ने अधिकृत स्टेटमेंट जारी केलंय. त्यानुसार, "श्रीमती मनेका गांधींचे आभार. PFA ने या प्रकरणात लक्ष घातलं. सर्वांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे अखेर गाढवाची सुटका करण्यात आलीय. आम्हाला सांगण्यात आनंद होतोय की बिग बॉसच्या टीमने गाढवाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात सर्वांनी केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. या प्रकरणात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे खूप आभार."
नेमकं प्रकरण काय?
Bigg Boss 18 मध्ये यावेळी एका गाढवाला घरात पाठवण्यात आलं होतं. या गाढवाला २४ तास बांधलेलं पाहायला मिळत आहे. 'पेटा'ने यावर नाराजी दर्शवत शोच्या मेकर्सला पत्र लिहिले आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, "बिग बॉसच्या घरात गाढवाला ठेवण्यात आल्याने बऱ्याच लोकांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारी योग्य आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष होऊ नये. सेटवर अशा प्रकारे एखाद्या प्राण्याला ठेवणं ही मजेशीर बाब नाही. मनोरंजनासाठी प्राण्यांचा वापर करु नका." यासोबत त्यांनी पत्रात सलमानला विनंती केली की होस्ट आणि स्टार कलाकार या नात्याने त्याने गाढवाला पुन्हा मेकर्सकडे सोपवलं पाहिजे. जेणेकरुन त्याला इतर सुटका केलेल्या गाढवांसोबत पाठवण्यात येईल. अनेकांचं म्हणणं आहे की, हे गाढव घरात सहभागी असलेल्या गुणरत्न सदावर्तेंचं आहे.