Join us

रामायण, महाभारत नंतर 'या' मालिकेच्या पुनःप्रसारणाची होतेय मागणी, सुरू होणार का 'ही' मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 2:29 PM

रामायण आणि महाभारतानंतर आता आणखी एक मालिका पुन्हा दाखवली जावी अशी मागणी सोशल मीडियाद्वारे लोक करत आहेत.

ठळक मुद्देशक्तिमान ही मालिका पुन्हा दाखवली जावी अशी मागणी सोशल मीडियाद्वारे लोक करत आहे. त्यामुळे सध्या ट्विटरवर #Shaktiman ट्रेंड होऊ लागला आहे.

रामायण आणि महाभारत या मालिकांना नव्वदीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या मालिका सुरू असताना लोक आपापल्या घरातच थांबत असत. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट असायचा. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने आपल्याला सगळीकडेच अतिशय शांत वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमुळे लोकांना रामायण आणि महाभारत या कार्यक्रमांची आठवण आली आहे. रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिकांचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सोशल मीडियावर होत होती आणि आता तर उद्यापासून प्रेक्षकांना रामायण ही त्यांची आवडती मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा पहिला भाग नॅशनल दूरदर्शनवर उद्या सकाळी नऊ वाजता आणि दुसरा भाग रात्री नऊ वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे.

आता या दोन मालिकांनंतर आणखी एक मालिका पुन्हा दाखवली जावी अशी मागणी सोशल मीडियाद्वारे लोक करत आहेत. मुकेश खन्नाची मुख्य भूमिका असलेला शक्तिमान हा कार्यक्रम एकेकाळी चांगलाच गाजला होता. या मालिकेला छोट्या मुलांपासून वृद्धांपर्यंतचे प्रेम मिळाले होते. ही मालिका पुन्हा दाखवली जावी अशी मागणी सोशल मीडियाद्वारे लोक करत आहे. त्यामुळे सध्या ट्विटरवर #Shaktiman ट्रेंड होऊ लागला आहे.

पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री.. एक सामान्य व्यक्ती.. सामान्य असूनही मन:शांती आणि ध्यानधारणा करून त्याने सुपरपॉवर मिळवली. शत्रूचा तो कर्दनकाळ ठरला. ज्याचे खरे नाव शक्तिमान. छोट्या पडद्यावर १९९० च्या दशकात शक्तिमान ही मालिका आली आणि बघता बघता या मालिकेने बच्चेकंपनीच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मुकेश खन्ना यांनी साकारलेली शक्तिमानची भूमिका आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे. आजही प्रेक्षक इतक्या वर्षांनी देखील मुकेश खन्ना यांना शक्तिमान म्हणूनच ओळखतात.

टॅग्स :रामायण