रात्रीस खेळ चाले (Ratris Khel Chale) या मालिकेत शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिने काही दिवसांपूर्वी अचानक मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिच्या जागी या भूमिकेत कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) पाहायला मिळत आहेत. अपूर्वाच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. त्यानंतर चाहते तिला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक होते. तर लवकरच अपूर्वा नेमळेकर मालिकेत काम करताना दिसणार आहे. या मालिकेचे नाव आहे स्वराज्य सौदामिनी ताराराणी (Swarajya Saudamini Tararani).
स्वराज्याच्या इतिहासातले एक सोनेरी पर्व उलगडणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. स्वराज्य राखून ते वृद्धिंगत करण्याचा महाराणी ताराराणी यांचा प्रवास प्रेक्षकांना भारावून टाकणारा आहे, रायगडावर भाऊबंदकी माजून स्वराज्य संपेल, ही औरंगजेबाची अटकळ फोल ठरून राजाराम महाराजांचं मंचकारोहण झालं. औरंगजेबाच्या सततच्या षड्यंत्रांमुळे स्वराज्याच्या छत्रपतींचे रक्षण महत्त्वाचे, ही भूमिका घेऊन ताराराणींनी राजाराम राजेंना जिंजीस जाऊन राहायचा सल्ला दिला. खूप विचार विनिमयानंतर ते यासाठी तयार झाले. जिंजी हा स्वराज्यातला दक्षिणेकडचा अजिंक्य असा किल्ला होता, पण तिथे पोचण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास करून जावं लागणार होतं. या प्रवासात जिवाचा धोका होता आणि औरंगजेबाचं सैन्य सतत राजाराम राजेंच्या मागावर होतं. त्या वेळी ताराराणींनी राणी चेन्नम्मा यांची मदत घ्यायचं ठरवलं. औरंगजेबाचा धोका माहीत असूनही राणी चेन्नम्मा राजांना मदत करतील का ? राजाराम राजे जिंजीला सुखरूप पोहचू शकतील का ? हा ताराराणींच्या कालखंडातला राणी चेन्नम्मा यांचा अत्यंत नाट्यमय घटनांनी भरलेला महत्त्वाचा टप्पा 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत उलगडणार आहे.
राणी चेन्नम्माच्या भूमिकेत दिसणार अपूर्वा'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत येत्या काही भागांत राणी चेन्नम्माची व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर साकारणार आहे. अपूर्वाचा चाहतावर्ग मोठा असून तिला नवनवीन भूमिकांत पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. या भूमिकेतसुद्धा अपूर्वा प्रेक्षकांना भुरळ पाडेल का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.