Join us

सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 1:53 PM

Suyash Tilak : सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, नेहा महाजन, सौरभ गोखले यांच्यासह अनेक कलाकारांनी मतदान केले आहे. मात्र सावनी रविंद्र हिचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे तिला मतदान करता आले नाही. त्यानंतर आता अभिनेता सुयश टिळकसोबत असेच काहीसे घडले आहे.

आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान (Lok Sabha Election 2024) पार पडत आहे. पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार केंद्राबाहेर लोकांनी गर्दी केली आहे. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, नेहा महाजन, सौरभ गोखले यांच्यासह अनेक कलाकारांनी मतदान केले आहे. मात्र सावनी रविंद्र (Savani Ravindra) हिचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे तिला मतदान करता आले नाही. त्यानंतर आता अभिनेता सुयश टिळक(Suyash Tilak)सोबत असेच काहीसे घडले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. 

सुयश टिळकने इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिले की, गेल्यावेळी मतदान केले तेव्हा नावात चूक असलेली सुधारायचा अर्ज दिला होता. ह्यावेळी सुदैवाने ऑनलाइन पोर्टलवर खूप शोधून शेवटी नाव सापडले असताना (त्यात तीच चूक होतीच). व्होटिंग बूथला सकाळी ७ वाजता पोहोचलो. माझ्या ऑनलाइन पोर्टलवरच्या यादीच्या नोंदीत असलेल्या जागी बूथवर असलेल्या यादीत मात्र वेगळेच नाव आढळले. म्हणून ३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधायचा प्रयत्न केला. अचानक यावेळी काही जणांचा मतदार संघच बदलला आहे ते कळले म्हणून वेगळ्या मतदार संघात पण चौकशी केली, शोधाशोध केली.

तो पुढे म्हणाला की, गेली अनेक वर्ष मी मतदान न चुकता करत आलो आहे. ह्यावेळी मला तो हक्क बजावता आला नाही. कोणत्याही इतर पर्यायाने देखील मतदान करू दिले नाही. ह्याची खंत वाटते वाटत राहील. सुयश टिळकने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, दुर्दैवाने माझ्या मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला. कारण यावर्षी माझे नाव गूढपणे यादीतून गायब झाले.

टॅग्स :सुयश टिळकलोकसभा निवडणूक २०२४