बिग बॉस मराठीचा नव्या सीझनची काल सांगता झाली. सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा महाविजेता झालाय. सूरज जिंकताच संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालंय. महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून सूरजवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा होस्ट रितेश देशमुखने सूरजसोबत खास सेल्फी काढला. बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यावर सूरजने रितेशची खास भेट घेतली. तेव्हा जिनिलीयाही तिकडे उपस्थित होती. तेव्हा सूरज असं काय म्हणाला की सर्वजण हसायला लागले.
सूरज रितेश-जिनिलीयाला काय म्हणाला?
सूरज आणि रितेशची व्हॅनिटी व्हॅनमध्ये भेट झाली. सूरजने रितेशला मिठी मारली. रितेश म्हणाला, "अभिनंदन अभिनंदन! क्या बात है सूरज." पुढे सूरज रितेशला म्हणाला, "लय बरं वाटलं तुम्हाला भेटून." पुढे रितेश सूरजला म्हणतो, "मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय. माझा पहिला शो आहे बिग बॉस आणि तुम्ही विजेता झालाय." पुढे सूरज रितेशला म्हणतो, "तुम्ही आले म्हणून मी आलो." हे ऐकताच रितेश-जिनिलीया आणि सर्वजण हसायला लागले. सूरज पुढे म्हणाला, "तुम्ही होता म्हणून मी ठरवलं की जायचं. नाहीतर मी येतच नव्हतो. नंतर कळलं की रितेश सर आहेत तर चला. झापुकझुपुक पॅटर्न दाखवतो गोलीगत."
सूरज झाला बिग बॉस मराठी ५ चा महाविजेता
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेसाठी अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य पाचव्या सीझनचे फायनलिस्ट होतं. सूरजने ट्रॉफी जिंकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तर इंडियन आयडॉलनंतर रिएलिटी शोचा विजेता होण्याचं अभिजीत सावंतचं स्वप्न मात्र थोडक्यात हुकलं. अभिजीत बिग बॉस मराठी ५ चा उपविजेता ठरल्याने त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.