‘अग्गबाई सासुबाई’ मालिकेचा दुसरा भाग ‘अग्गबाई सूनबाई’ नावाने सुरु करण्यात आली. खरंतर मालिका सुरु झाली तेव्हापासून पाहिजे तशी रसिकांची पसंती मिळालेली नाही. नव्या ढंगात मालिका असली तरी मालिकेतल्या कथेत नाविन्य काहीच जाणवत नाही. त्यामुळे मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला तेव्हाच विविध प्रतिक्रीया देत मालिकेवर नापसंती दिल्याचे दिसले होते. मालिका सुरु होवून बरेच दिवस झाले तरी रसिकांचे मनोरंजन करण्यात कलाकारांनाही हवे तसे यश मिळालेले नाही.
रसिकांना जास्तीत जास्त मनोरंजन करता यावे म्हणून रोज नवनवीन रंजक वळणं मालिकेत दाखवण्यात येते. मालिकेतील अनेक ट्विस्टही सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे रसिकांची पसंती मिळवण्यासाठी मेकर्स प्रयत्नात असताना मालिकेतल्या एका दृष्यामुळे रसिकांची माफी मागण्याची वेळ आता कलाकारांवर आली आहे. त्याचे झाले असे की,मालिकेत शुभ्रासुद्धा स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करताना दाखवण्यात आले आहे. दोन पैसे कमावता यावे यासाठी तिची धडपड सुरु असते.
शुभ्रा मशीनवर बसून कपडे शिवताना दाखवण्यात आले.त्याचवेळी शुभ्राला काम करताना पाहून सोहमचा चांगलाच पारा चढतो.तिला वाट्टेल तसे तो बोलतो, तिचा अपमान करतो. तिच्या आत्मसन्मानाला दुखवण्यासाठी सोहम तिच्या शिलाई मशीनची मोडतोड करतो आणि त्या मशिनला लाथ मारतो, असे दाखवण्यात आले होते. शिलाई मशिनला लाथ मारल्याचे दृष्य पाहून शिंपी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. या दृष्यावर त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
अखेर अद्वैत दादरकने घडलेल्या प्रकारावर माफी मागितली. या दृष्यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. कथानकाचा एक भाग म्हणून तो भाग तशापद्धतीने शूट करण्यात आला होता.या भागाचे शूटिंग झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी शिलाई मशिनला नमस्कार केला. आम्हा कलाकारांना देखील हे दृष्य शूट करताना वाईट वाटले होते.त्यामुळे जाहीरपणे आम्ही मागतो. यापुढे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल असेही आश्वासन अद्वैत दादरकरने दिले.
‘अग्गंबाई सूनबाई’ तर 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचा सिक्वेलच, रसिकांनीच सांगितली पुढची कथा
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिके सारखीच ‘अग्गंबाई सूनबाई’ ही मालिका असल्याचे वाटत आहे.मालिकेत कलाकार जरी वेगळे असले तरी कथानक मात्र 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेसारखेच असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. मालिकेच्या पहिल्या भागात सोहमला सडेतोड उत्तर देणारी शुभ्रा दाखवण्यात आली होती. त्याउलट दुस-या भागात शुभ्राचं पात्र अतिशय सौम्य दाखवण्यात आले आहे.