वाहतूक कोंडी ही समस्या दिवसेंदिवस वाढत उग्र रूप धारण करीत आहे. जगामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. सामान्य जनतेसह अनेक कलाकार मंडळींनादेखील या वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कामानिमित्त अनेक मराठी कलाकार मुंबई-ठाणे असा प्रवास करत असतात. त्यामुळे अनेकजण ठाणे-घोडबंदर या मार्गाचा वापर करतात. मात्र या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे अनेकजण त्रस्त झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकमुळे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर वैतागल्या आहेत.
ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी पाहायला मिळेतेय. ऐश्वर्या या स्वत: रस्त्याच्या मधोमध इतर गाड्यांमध्ये अडकलेल्या दिसून येत आहेत. त्याच्या मागे व पुढे अशा अनेक गाड्या आहेत. अक्षरश: रस्त्यावर लांबलांब पर्यंत गाड्या उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत. याच गंभीर परिस्थितीवर ऐश्वर्या यांनी त्याची भूमिका व्यक्त केली आहे. ऐश्वर्या नारकर यांनी #खड्डे #ट्राफिक असे हॅशटॅग्ज वापरले आहेत.
ऐश्वर्या या दुसऱ्या व्हिडीओमध्ये म्हणतात, "रस्ता न होण्यामागे आणि वाहतूक कोंडी असण्यामागे प्रत्येकाची बाजू असेल. सरकारची बाजू असेल, राजकारण्यांची बाजू असेल. त्याच्यानंतर ज्यांना या रस्त्यांचं कंत्राट मिळतं त्यांचीही बाजू असेल. याशिवाय कामगारांचीही एक बाजू असेल. पाऊस, वातावरण सगळ्याच गोष्टी आपण मान्य केल्या तरी आता आपली बाजू समजून घेण्याची वेळ आली आहे. पैसा, वेळ, एनर्जी, वेळेत पोहोचण्याचं टेन्शन या सगळ्यांसाठी आता आपली बाजू समजून घेणं गरजेचं आहे".
वाहतूक कोंडीवर संताप व्यक्त करणाऱ्या ऐश्वर्या नारकर या पहिल्याच कलाकार नाहीत. यापुर्वी अभिनेता शशांक केतकर यानेही रोडवरील ट्रॅफिकबद्दलची समस्या व्यक्त केली होती. तसेच अभिजीत खांडकेकरनेही या वाहतूक कोंडीच्या व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला होता. यासोबतच अभिनेत्री सुप्रिया पाठारे, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव व चेतना भट यांनीही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं होतं.